कराड प्रतिनिधी | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाटण, कोयना, बामणोली, कांदाट, चांदोली, ढेबेवाडी, हेळवाक आणि आंबा या वन परिक्षेत्रांतील जंगलातील ८१ मचानावर बसून अरण्यवाचनाचा थरारक अनुभव घेण्याची संधी निसर्ग प्रेमींना मिळाली. ढगाळ वातावरण, दाट धुके व पाऊस असूनसुद्धा अपुऱ्या प्रकाशात पार पडलेल्या या गणनेत बिबट्यासह एकूण १६ सस्तन वन्य प्राणी प्रजातींचे तसेच ११ वन्य पक्षी, परीसृप प्रजातींचे दर्शन निसर्गप्रेमींना घडले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बौध्द पौर्णिमेला पाणवठ्यावरील ८१ मचानावर केलेल्या गणनेमध्ये १६ प्रकारचे सस्तन वन्य प्राणी व ११ प्रकारचे वन्य पक्षी, परीसपृ प्रजातीचे २०० वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्याची नोंद निसर्गप्रेमींनी केली.
निसर्गानुभव कार्यक्रम २०२४ मध्ये सहभागी होण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी याबरोबरच नगर, पुणे, मुंबई येथूनही निसर्गप्रेमींनी हजेरी लावली होती. त्यांच्याकडून भरून घेण्यासाठी प्रपत्र देण्यात आले होते. यानुसार २०० हून अधिक वन्यप्राण्यांची नोंद झाली आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या निसर्ग प्रेमींना रात्री पाणवठ्यावर जलपाणासाठी आलेल्या वन्य प्राण्यांची नोंद प्रपत्रावर करण्यास सांगण्यात आले होते.
निसर्गानुभव कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच् क्षेत्र संचालक श्री. एम. रामानुजम, उपसंचालक कोयना श्री. उत्तम सावंत तसेच उपसंचालक चांदोली स्नेहलता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पातील आठ वनक्षेत्रपाल यांनी परिश्रम घेतले.