पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील चाफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात असलेल्या लोकवस्तीतील दीपक उर्फ गोट्या सपकाळ यांच्या घराबाहेर ठेवलेल्या कपाटातील तब्बल १६ कोंबड्यांचा बिबट्याने फडशा पडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दीपक सपकाळ यांनी कोंबड्या पाळलेल्या होत्या. घराच्या बाहेरील बाजूस कोंबड्या ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी रात्री उशिरा घरातील मंडळी झोपी गेली असता दीड वाजण्याच्या सुमारास बिबट्याने कोंबड्यांवर हल्ला चढवत तब्बल १६ कोंबड्यांचा फडशा पाडला. शुक्रवारी सकाळी उठल्यावर हा प्रकार निदर्शनास आला. बिबट्याने जवळच्या शेतात कोंबड्यांना ठार मारल्याने या ठिकाणी पिसांचा सडा पसरला होता. या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले.
या परिसरात बिबट्याचा दोन ते तीन महिन्यांपासून संचार वाढला आहे. याची कल्पना वनविभागाला असतानाही वनविभागाचे अधिकारी फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे वनविभागाच्या अशा कार्यपद्धतीबाबत नागरिकांमधून उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे. बिबट्याचा मानवी वस्तीच्या परिसरातील मुक्काम वाढल्यामुळे नागरिक प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत. कधीही आणि कुठेही बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बाबीचा गांभीर्याने विचार करून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन बिबट्याचा तातडीने, बंदोबस्त करावा, अशीही मागणी जोर धरीत आहे.