सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा हा ऊस उत्पादनात अग्रेसर असा जिल्हा आहे. दरवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घेतले जाते. दरम्यान, यंदा ऊस गळीत हंगामाने गती घेतली असून आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व 15 कारखान्यांनी मिळून 34,63,057 टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्यांनी 30,70,340 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 8.83 टक्के आहे. यंदा बहुतांशी कारखान्यांनी आपली क्षमता वाढवली आहे. दररोज 82 हजार 200 टन क्षमतेने कारखाने गाळप करत आहेत.
सात खासगी तर ८ सहकारी असे १५ साखर कारखाने गाळप करत आहेत. यंदा सहकारी साखर कारखान्यांना चांगला साखर उतारा मिळत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कृष्णा कारखान्याने सर्वांत जास्त गाळप केले असून, ५,१८,२६० टन उसाचे गाळप केले असून, ४,८०,५६० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
साखर उताऱ्यात बाळासाहेब देसाई साखर कारखान्याने आघाडी घेतली असून त्यांचा उतारा ११.०२ टक्के आहे. श्रीराम कारखान्याने १,८६,२५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. तर कृष्णा कारखाना रेठरे बुद्रुकने ४,८०,५६० क्विंटल, किसन वीर वाई कारखान्याने २,०२१२० क्विंटल, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने ८७,९०० क्विंटल, सह्याद्री कारखान्याने ३,३१,३४० क्विंटल, अजिंक्यतारा कारखान्याने २,३९,२७० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.