शेरेत 12 एकरांतील ऊस जळून खाक; भरदुपारी शॉर्टसर्किटमुळे घडली दुर्घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील शेरे येथील मारुती पाणंद शिवारात रविवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत १२ एकर ऊस जळाल्याने नुकसान झाले. भर दुपारी आग लागल्याने तिचा वणवा इतका मोठा होता, की काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. बघता बघता सुमारे १२ एकर उसाचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्या प्रयत्नांना यश आले नाही.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड – तासगाव मार्गालगत मारुती पाणंद शिवार आहे. या शिवारातील सव्र्व्हे नंबर ९२ मधील शेतातील उसाच्या उभ्या पिकात विजेचे शॉर्टसर्किट झाल्यामुळे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास या पिकाने पेट घेतला. रखरखत्या उन्हात आग लागल्याने जवळच्या शेतात ही आग विस्तारत गेली. आणि बघता बघता सुमारे बारा एकर ऊस जळाला. आगीची दाहकता मोठी असल्याने ती विझवता येत नव्हती. तरीही काही शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले; परंतु ते प्रयत्न अपुरे ठरल्याने अखेरीस यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा अग्निशमनला पाचारण करण्यात आला. बंबाद्वारे आग विझवली. तरीही क्षेत्र लांब पल्ल्याचे असल्याने शेवटपर्यंत आग विझवता आली नाही.

यात विलासराव सपकाळ, धनाजी पवार, महादेव पवार, बाळू पवार यांच्यासह दहा शेतकऱ्यांच्या सुमारे १२ एकर क्षेत्रातील ऊस जळाला. गावकामगार तलाठी अमोल महापुरे, कर्मचारी जितेंद्र गायकवाड यांनी पंचनामे केले आहेत.