सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने 236 जागांची भरती प्रक्रिया येथील पोलीस कवायत मैदानावर बुधवारपासून सुरु झाली . पहिल्या दिवशी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत 1011 उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली सायंकाळी साडेसात पर्यंत ही भरती प्रक्रिया सुरु होती.
सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 235 जागांसाठी भरती प्रक्रिया पुढील सात दिवस राबवली जाणार आहे. या भरतीसाठी सातारा जिल्हा पोलीस दलाला 13 हजार 30 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार सकाळी सात वाजल्यापासून पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत भरती प्रक्रियेला पोलीस कवायत मैदानावर सुरुवात झाली. सुरुवातीला पहिल्या टप्प्यांमध्ये 300 उमेदवारांची शैक्षणिक अर्हता संचिका सहा पासपोर्ट साईज फोटो याची नोंद करण्यात येऊन प्रत्यक्ष शारीरिक चाचणीला सुरुवात करण्यात आली.
यामध्ये सोळाशे मीटर व 100 मीटर धावणे आणि गोळा फेक अशा तीन चाचण्या घेण्यात आल्या. रात्री उशिरापासूनच पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी साताऱ्यात यायला सुरुवात केली होती सातारा पोलिसांनी सातारा ग्रामीण तसेच अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांसाठी कवायत मैदान परिसरातील मंगल कार्यालय पोलीस करमणूक केंद्र या ठिकाणी निवासाची सोय केली होती.
या भरती प्रक्रियेसाठी सातारा जिल्ह्याचे दीडशे अधिकारी आणि कर्मचारी या भरती प्रक्रियेत सहभागी झालेले आहेत. पोलीस कवायत मैदानासाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून या परिसरातील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे भरती प्रक्रियेमध्ये सातारा पोलिसांना तृतीयपंथीयाचा एक अर्ज प्राप्त झालेला आहे उमेदवारांचे रेटीना स्कॅन बायोमेट्रिक स्कॅन घेण्यात आले असून सर्व शारीरिक नोंदणी या ऑनलाइन घेतल्या जात आहेत. भरती प्रक्रियेतील गैरप्रकार टाळणे आणि पारदर्शकता ठेवणे यासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.