कराड प्रतिनिधी | मुंबईहून हुबळीला हवालाची रक्कम घेऊन निघालेल्या कारमधील ३ कोटींची रक्कम लुटणाऱ्या टोळीतील १० जणांना अटक करण्यात आली आहे. एकूण लुटलेल्या रक्कमेतील अर्धी रक्कम पोलिसांनी संशयितांकडून हस्तगत केली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या एका महिलेसह १० जणांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुणे-बंगळुरू महामार्गावर मलकापुरातील ढेबेवाडी फाट्यावर मंगळवारी मध्यरात्री कुरियर कंपनीची कार अडवून धाडशी लूट करण्यात आली होती. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दल हादरून गेले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाची चक्रे गतिमान करत या लुटीचा अवघ्या काही तासात पर्दाफाश करण्यात यश मिळविले. या प्रकरणातील मुख्य सुत्रधारासह अन्य संशयितांची नावेही निष्पन्न केली. त्यानंतर काही संशयितांना ताब्यात घेऊन लुटीची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त केली.
या लूट प्रकरणातील कटाच्या सुत्रधारासह दोघे फरार असून कराड पोलीस त्यांच्या मागावर आहेत. कराडमधील पोलिसांच्या रेकॉडवर असलेला गुंड या लूट प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्यासह दोघांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्तय फरारी संशयितांना देखील ताब्यात घेण्यात यश येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक राम तासीलदार यांनी दिली.