‘लेक लाडकी’तून जिल्ह्यातील 1 हजार मुलींच्या खात्यावर 5 हजार निधी जमा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मुलींच्या सक्षमी करणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. ही योजना राबवण्यास सातारा जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यातील 1 हजार मुलींच्या खात्यात प्रत्येकी 5 हजार रुपयांचा निधी जमा केला आहे.

या योजनेमुळे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देवून त्यांचा जन्मदर वाढण्यास मदत होणार आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्यामध्ये अनुदान देण्यात येवून रोख स्वरूपात पैसे देण्यात येणार आहेत.

पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये, तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये याप्रमाणे 1 लाख 1 हजार रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागामार्फत प्रभावीपणे योजना राबविण्यात आली. त्यासाठी शासनाकडून 1 हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. उद्दिष्ट पूर्ण करण्यात महिला व बालविकास यशस्वी झाला आहे.

1 हजार मुलींना लेक लाडकीतून अनुदानाचा लाभ

सातारा जिल्ह्यात लेक लाडकी योजना प्रभावीपणे राबवण्यात आली. त्यानुसार जावली 29, कराड 224, खंडाळा 41, खटाव 66, कोरेगाव 122, महाबळेेश्वर 11, माण 46, पाटण 97, फलटण 95, सातारा 198, वाई 71 असे मिळून जिल्ह्यात 1 हजार मुलींना या लेक लाडकी योजनेचा लाभ देण्यात आला आहे.