सातारा प्रतिनिधी । ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यभरात सुरु करण्यात आली असून सातारा जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी गतीने सुरू आहे. आतापर्यंत या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी१ लाख १२ हजार ८४ महिलांची नोंदणी करण्यात आली आहे.
‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेसाठी आवश्यक असलेल्या अटी शर्तींची पुर्तता करणाऱ्या महिलांनी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांच्याकडे सादर करावेत तर शहरी भागातील अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, वार्ड अधिकारी, सेतु सुविधा केंद्र यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात या योजनेसाठी प्रभावीपणे यंत्रणा राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महिलांकडून फ़ॉर्म भरून घेणे तसेच नाव नोंदणी करण्याचे काम गतीने सुरू आहे.
जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी पालकमंत्री देसाई यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील सर्व घटक कार्यरत आहेत. या योजनेसाठी तहसील कार्यालयांतील सेतू केंद्रांवर गर्दी होऊून महिलांची ससेहोलपट होऊ नये म्हणून अंगणवाडीसेविका, ग्रामसेवक, तलाठी घरोघरी जाऊन माहिती गोळा करतील तसेच पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जागेवरच ॲपच्या माध्यमातून भरण्यात येतील, अशी यंत्रणा राबविली जात आहे. त्यामुळे महिलांची नाेंदणी होण्याची काम गतीने सुरू आहे. आतापर्यंत १ लाख १२ हजार ८४ महिलांची नोंदणी झाली आहे.