सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध नावीन्यपूर्ण खेळामध्ये गोडी लागावी, खेळातून विद्यार्थी तंदुरुस्त व्हावेत यासाठी नावीन्यपूर्ण असा ‘मिशन खेलो सातारा’ हा उपक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू केला असून त्यासाठी जिल्ह्यातील 60 प्राथमिक शाळांची निवड करण्यात आली आहे.
शिक्षणात खेळ आणि खेळाची महत्त्वाची भूमिका असते. विविध खेळांतून विद्यार्थ्यांना सांघिक कार्य, नेतृत्व, जबाबदारी आणि संयम यासारखी जीवनकौशल्ये शिकवतात. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील 60 शाळांमध्ये ‘मिशन खेलो सातारा’ हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. असा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारी सातारा ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद ठरली आहे.
उपक्रमांतर्गत निवड केलेल्या शाळांमध्ये मनरेगा योजनेतून क्रीडांगण सपाटीकरण, संरक्षक भिंत, मैदान निर्मिती इत्यादी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या क्रीडा कार्यालयामार्फत विविध खेळांचे साहित्य दिले जाणार आहे. खेळांमध्ये विद्यार्थी प्राविण्य मिळवतील व शासकीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवतील या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी शाळांमधील क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ज्या- ज्या तालुक्यात कोणत्या खेळात विद्यार्थी प्राविण्य आहेत त्यादृष्टीने शाळा निवडून त्या खेळावर त्या शाळांमध्ये तालुक्यातील विद्यार्थ्यांना खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.