सातारा प्रतिनिधी । नांदेड येथील शासकीय रुग्णालयात घडलेल्या रुग्णाच्या मृत्यूच्या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेच्या उपचार पद्धतीवर तसेच येथून दिल्या जाणाऱ्या सुविधांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, या घटनेपूर्वी सातारा जिल्ह्यातील 4 वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कामकाजात अनियमितता दिसून आल्याबद्दल नोंदीस बजावल्या आहेत.
सातारा तालुक्यातील वेणेगाव, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील हलगर्जीपणा करणाऱ्या चार वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी नोटीसा काढल्या आहेत. गेल्या आठवडाभरात खिलारी यांनी दोन्ही केंद्रांना अचानकपणे भेट दिली. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी दारात आणि वैद्यकीय अधिकारी बाहेर असे चित्र दिसून आले. मुख्य कार्यकारी अधिकारी जेव्हा रुग्णालयात गेले त्यावेळी त्या ठिकाणी चारही अधिकारी गैरहजर होते. तर एका केंद्रावर कामकाजात अनियमितता दिसून आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य विभागांना भेटी देऊन आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यादरम्यान काही आरोग्य केंद्रांमध्ये हलगर्जीपणा सुरु असल्याचे लक्षात आले. वेणेगाव आरोग्य केंद्रात दोन कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असून नांदगाव येथे कायमस्वरुपी तत्वावरील वैद्यकीय अधिकारी आहेत. वेणेगाव येथील आरोग्य केंद्र नव्याने झाले असून त्या ठिकाणी नागरिकांच्या उपचारासाठी लाखो रुपयांचे नवीन साहित्य देण्यात आले आहे.
मात्र, त्या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अद्याप साहित्याचा वापरच सुरु केला नसल्याचे स्पष्ट झाले. वेणेगाव व नांदगाव परिसरातून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा फटका रुग्णांना बसत आहे.