सातारा प्रतिनिधी | संपूर्ण सातारा जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना फलटण तालुक्यात घडली आहे. फलटण तालुक्यातील ठाकूरकी येथील पंदरकी नावाच्या शिवारात एकाचा खून झाल्याचे समोर आले आहे. संदीप मनोहर रिटे (वय 35) असे त्यांचे नाव आहे. संशयिताने संदीप यांचा खून करून मृतदेह जमिनीत अर्धवट पुरला आहे. मृतदेहाच्या डोक्यात व गळ्यावर गंभीर जखमा असून गुप्तांगाचाही भाग अर्धवट कापल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सकाळी ठाकूरकी गावातील पंदरकी नावाच्या शिवारात रस्त्यावरील खड्ड्यात अर्धवट पुरलेला मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अर्धवट पुरलेल्या पुरुषाच्या मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांच्या समोर आव्हान उभे होते. याचदरम्यान सोनाली संदीप रिटे (रा. ठाकूरकी, ता. फलटण) या पती बेपत्ता झाल्याची तक्रार द्यायला आल्या होत्या. पोलिसांनी त्यांना पंदरकी नावाच्या शिवारात बेवारस प्रेत आढळले आहे, तेथे जाऊन खात्री करून घ्या असे सांगितले. त्यानंतर संबंधीत मृतदेह फिर्यादी महिलेचा पती असल्याचे स्पष्ट झाले.
खून झालेले संदीप रिटे व त्यांच्या पत्नी हे दोघेही विमानतळा शेजारील नाना नानी पार्कमध्ये कामास होते. मंगळवार, दि. 10 रोजी संदीप रिटे हे पत्नीस बिरदेव नगर या ठिकाणी त्यांच्या माहेरी सोडून कामावर गेले. यानंतर दुपारी 4 च्या सुमारास सोनाली या सासरी आल्या. मात्र, सायंकाळी 7 वाजले तरी संदीप घरी आले नाहीत तसेच त्यांचा फोनही लागत नव्हता. ही माहिती त्यांनी बुधवारी वडील आणि भाच्याला दिली. यानंतर कुटूंबियांनी संदीप यांची शोधाशोध केली. मात्र, ते कोठेही आढळून न दिल्याने पती बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी फलटण शहर पोलिस ठाण्यात गेल्या होत्या.
दरम्यान, पोलिसांना जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढल्यावर मृतदेहाच्या डोक्यावर, गळ्यावर खोलवर जखमेच्या खुणा दिसून आल्या. तसेच गुप्तांग अर्धवट कापलेल्या अवस्थेत दिसून आले. त्या ठिकाणी रक्ताचा सडा पडला होता. तर संदीप यांची दुचाकी तावडी रोडवर आढळली आहे. घटनास्थळावर डॉग स्कॉड, फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचार्यांनाही बोलावले होते.