मलकापूर-आगाशिवनगर परिसरातून देशी बनावटीचे पिस्टल अन् काडतुसासह युवकास अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मलकापूर-आगाशिवनगर परिसरातुन एक देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसासह एका युवकास अटक केली आहे. लवराज रामचंद्र दुर्गावळे (वय 29, रा. आगाशिवनगर- मलकापुर), असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 60 हजार रुपये किंमतीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, आगाशिवनगरमधील इमर्सन कंपनी जवळ एक युवक देशी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक पतंग पाटील व पथकास माहिती देवून तात्काळ कारवाई करण्यास सांगितले.

डीबी पथकाने इमर्सन कंपनी शेजारी सापळा रचला. त्यानंतर तेथे आलेल्या एका संशयित युवकाला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक देशी बनावटीची मॅगझिन सह पिस्टल व जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक पतंग पाटील, उपनिरीक्षक अझरूद्दीन शेख, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे. महेश शिंदे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी ही कारवाई केली.