सातारा प्रतिनिधी । पोलीस प्रशासनाकडून मोठ-मोठ्याने कर्णकर्कश करणाऱ्या डीजेंवर कारवाई केली जाते. मात्र, या डीजेच्या ठोक्यांमुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. अशी घटना वाई येथे घडली आहे. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने वाईमधील तरुणाचा बळी घेतला आहे. या तरुणावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हेमंत दिलीप करंजे (वय ३८) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार दि. १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी वाई शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये चार ते पाच डीजेंचा समावेश होता. एकत्रित डीजे लावल्यामुळे वाई शहर दणाणून गेले. मिरवणूक वाईच्या किसन वीर चौकात आली असताना चार ते पाच डीजे वादकांमध्ये कोण जोरात वाजवतो? याची स्पर्धा लागली. परिणामी आवाजाची मर्यादा देखील वाढविण्यात आली.
याचवेळी हेमंत दिलीप करंजे हा तरुण मिरवणूक पाहत त्या ठिकाणी थांबला होता. डीजेच्या आवाजाच्या दणक्याने चक्कर येऊन तो जागेवरच कोसळला. त्याला तातडीने वाईहून पुण्याला नेण्यात आले. तेथे त्याच्यावर पंधरा दिवस उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरुणाच्या म्रुत्युनंतर आता तरी पोलीस प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल शहरातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.