सातारा प्रतिनिधी | लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक यात्रा उद्या दि. 2 ते 12 एप्रिल कालावधीत होत आहे. यात्रासोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. भाविकांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अधिकार्यांना दिल्या.
शिंगणापूर यात्रेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, माळशिरस प्रांताधिकारी विजया पांगारकर, फलटण प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, दहिवडीच्या पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, सपोनि दत्तात्रय दराडे, शिंगणापूर सरपंच अनघा बडवे, उपसरपंच राजेंद्र पिसे, माजी सरपंच राजाराम बोराटे, देवस्थानचे व्यवस्थापक मंदार पत्की, कावडीधारक भाविक व अधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा तसेच आरोग्य विभागाने भाविकांना स्वच्छ व निर्जंतुक पाणी उपलब्ध करून द्यावे. वाहतूक व पार्किंगचे पोलिसांनी नियोजन करावे. वाहतूक व्यवस्थेची माहिती होण्यासाठी पोलिस व ग्रामपंचायतीने फ्लेक्स लावावे. अखंडीत वीज पुरवठा करावा, पुरेसा औषधसाठा तसेच वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका उपलब्ध ठेवावी, महामंडळाने पुरेशा बस फेर्या शिंगणापूरसाठी सोडाव्या. यात्रेपूर्वी व यात्रेनंतर ग्रामपंचायत विभागाने स्वच्छता मोहिम राबवावी.
यात्रेसाठी 150 हून अधिक फिरती शौचालये उपलब्ध करून दिली जाणार असून ग्रामपंचायत क्षेत्रातील बंद अवस्थेत असलेली सर्व शौचालय युनिट ग्रामपंचायत विभागाने सुरू करावीत. देवस्थान समितीने मंदिर परिसरात भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सर्व रस्त्यांची दुरूस्ती प्राधान्याने करावी, अशा सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या. बैठकीनंतर जिल्हाधिकार्यांनी मंदिर परिसर, मुंगीघाट परिसर, यात्रा परिसराची पाहणी केली.