कराड प्रतिनिधी । यशवंतनगर, ता. कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या ५ एप्रिल रोजी मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत कराड उत्तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam), भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या व सभासदांच्या माध्यमातून स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलची निर्मिती करण्यात आली आहे. या पॅनेलचा प्रचाराचा शुभारंभ कराड तालुक्यातील पाल येथून आज सायंकाळी ६ वाजता केला जाणार असल्याची माहिती स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचे नेते तथा भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्यावतीने देण्यात आली.
भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी धैर्यशील कदम म्हणाले की, सत्येचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे हे स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे स्वप्न होते. म्हणून कराड तालुक्यातील स्वाभिमानी ऊसउत्पादक सभासदांनी स्व. यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलची निर्मिती केली. या पॅनेलच्या उमेवारांचा प्रचाराचा शुभारंभ आराध्य दैवत पालीच्या खंडोबाच्या आशिर्वादाने पाल येथून ठीक ६ वाजता प्रचाराचा शुभारंभश्रीफळ वाढवून केला जाईल. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासद, मतदार बांधवांनी मोठ्या संख्येने पाली येथे आज प्रचाराच्या शुभारंभास उपस्थित राहावे, अशी विनंती करत आहे.
यावेळी रामकृष्ण वेताळ म्हणाले की, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलच्या सर्व उमेवारांच्या उपस्थितीत आज प्रचाराचा शुभारंभ पार पडणार आहे. या शुभारंभानंतर एक भव्य असा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यास सर्व सभासद, शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करत आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचे प्रमुख निवासराव थोरात, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांच्या वतीने पॅनेलच्या विजयासाठी सर्वोतोपरी प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. दरम्यान, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दि. 5 एप्रिल रोजी मतदान तर दि. 6 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, कारखान्याची संचालक संख्या 21 असून कराड, तळबीड, उंब्रज, कोपर्डे हवेली, मसूर, वाठार किरोली येथील गटांसह महिला राखीव, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती-जमाती, इतर मागास प्रवर्गातून हे संचालक निवडले जाणार आहेत. कराड, तळबीड, मसूर आणि वाठार किरोली या गटात प्रत्येकी 3, उंब्रज, कोपर्डे हवेली गटातून प्रत्येकी 2 संचालक निवडले जाणार आहेत. तर, महिला राखीव गटातून दोन महिलांनाही संधी मिळणार आहे.