कराडचे स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन नोव्हेंबर ऐवजी डिसेंबरच्या ‘या’ तारखेला होणार प्रदर्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सध्या विधानसभा निवडणुक सुरु असून या निवडणुकीचा फटका हा दरवर्षी होणाऱ्या कराडच्या स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनास बसला आहे. निवडणुकीमुळे कराड शेती उत्पन्न बाजार समितीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून १९ वे स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु-पक्षी प्रदर्शन (Yashwantrao Chavan Agriculture Exhibition) , कृषि महोत्सव यावर्षी नोव्हेंबर ऐवजी डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार असल्याची माहिती सभापती प्रकाश पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कराड येथील शेती उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळाच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उपसभापती संभाजी काकडे, संचालक विजयकुमार कदम, संभाजी चव्हाण, नितीन ढापरे, श्री. शंकरराव (सतिश) इंगवले, जयंतीलाल पटेल, जे. बी. लावंड, प्रभारी सचिव ए. आर. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सभापती प्रकाश म्हणाले कि, प्रतिवर्षी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराड येथे शेती उत्पन्न बाजार समितीचे वतीने दि. २४ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु-पक्षी प्रदर्शन, कृषि महोत्सव राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित करण्यात येत असते. हे प्रदर्शन राज्य भरातील शेतकऱ्यांच्या भरघोस प्रतिसादामुळे अविरत सुरू आहे. प्रतीवर्षी लाखो शेतकरी या प्रदर्शनाला भेट देऊन आधुनिक शेती, तंत्रज्ञानाची माहिती घेत असतात.

या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, जि. प. कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग, महसूल व सहकार विभाग तसेच इतर विविध विभाग सहभागी होऊन शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतात. परंतु यावर्षी प्रथमच प्रदर्शन कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू असून ही सर्व शासकीय यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त आहे.

तसेच ज्या मैदानात प्रदर्शन भरवण्यात येते ते मैदान देखील निवडणूक कामासाठी दि. १९, ते २३ नोव्हेंबर या कालावधीत आयोगाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे या वर्षीचे प्रदर्शन २४ ते २८ नोव्हेंबर ऐवजी दि. ६ ते १० डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. प्रदर्शनाच्या तारखेत झालेल्या बदलाची सर्व शेतकरी बांधव, नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.