कराड प्रतिनिधी । शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने भरविण्यात येणारे १९ वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन उद्या शुक्रवार दि. ६ रोजीपासून खुले होणार असल्याची अशी माहिती बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे यांनी दिली. उद्यापासून दि. १० डिसेंबर या चार दिवसात कृषीचा जागर पहायला मिळणार आहे. कमी कालावधीत बाजार समितीने शासन कृषी विभाग व सह यंत्रणांच्या मदतीने प्रदर्शनाची तयारी पूर्ण केली आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये शेती, औद्योगिक व पशुपक्षी, महिला बचतगट, आरोग्य या क्षेत्रातील पर्वणी पहायला मिळणार आहे.
माजी सहकार मंत्री (कै.) विलासराव पाटील – उंडाळकर यांच्या संकल्पनेतून या प्रदर्शनाची १८ वर्षापूर्वी मुहूर्तमेढ रोवली गेली. आजतागायत अखंडपणे हे प्रदर्शन भरवले जात आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी २४ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत प्रदर्शन भरवण्याची परंपरा आहे. परंतु यंदा या कालावधीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुका असल्याने आचारसंहितेमुळे प्रदर्शनाच्या वेळेत बदल करण्यात आला.
बदललेल्या तारखेनुसार उद्या शुक्रवारपासून हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले होत असून, शेती उत्पन्न बाजार समिती, शासन कृषी विभाग व जिल्हा परिषद, सातारा आदींच्या मार्गदर्शनाखाली डायनॅमिक इव्हेंटचे धीरज तिवारी यांच्या यंत्रणेने स्वा. सै. शामराव पाटील फळे व भाजीपाला (बैल बाजार) आवारात दिमाखदार मंडप उभा केला आहे.
चारशेहून अधिक स्टॉल सहभागी
उद्या शुक्रवारी प्रदर्शनाच्या दुपारी ऊस पीक स्पर्धा व प्रदर्शन होईल. यामध्ये नावीन्यपूर्ण कृषी आयुधे, औजारे निर्मिती स्पर्धा होणार आहेत. सायंकाळी ४ वाजता प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते औपचारीक उद्धघटन होईल. प्रदर्शनाच्या वेळेत बदल होवूनही यंदा प्रदर्शनात चारशेहून अधिक स्टॉल सहभागी झाले आहेत.
दुसऱ्या दिवशी ‘या’ मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्धघाटन
शनिवारी (दि. ७) सकाळी दहा वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. कराड उत्तरचे नवनिर्वाचित आ. मनोज घोरपडे अध्यक्षस्थानी आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर हे प्रमुख अतिथी उपस्थित राहणार आहेत. तर यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, कराड तालुका खरेदी – विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, कोयना सहकारी बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, कोयना दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई, फलटणच्या यशवंत सहकारी बँकेचे अध्यक्ष महेशकुमार जाधव, स्वा. सै. शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे हे प्रमुख अतिथी आहेत.
प्रदर्शनात ‘या’ महत्वाच्या असणार विविध स्पर्धा
शनिवारी (दि. ७) दुपारी साडेबारा वाजता ऊस पीक व केळी घड प्रदर्शन व स्पर्धा होतील. रविवारी (दि. ८) फुले प्रदर्शन स्पर्धा, गाय, म्हैस, बैल स्पर्धा होणार आहेत. सोमवारी (दि. ९) फळे व श्वान प्रदर्शन तसेच स्पर्धा होतील. मंगळवारी (दि. १०) भाजीपाला पिक, शेळी, मेंढी व पक्षी प्रदर्शन व स्पर्धा होणार आहेत. त्यादिवशी सायंकाळी सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या हस्ते शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार वितरण, स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ तसेच प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.