मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील नेत्र विभागाला दिली भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी नेत्रतपासणी शिबीरानिमित्त स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील नेत्र विभागाला भेट दिली. तसेच विभागाची पाहणी केल्यानंतर तेथील कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार दिनांक २९ मे २०२४ रोजी केडंबे तालुका जावली या डोंगराळ भागामध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दुर्गम व डोंगराळ भागातील लोक परिवहन तसेच इतर अडचणी मुळे वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहतात याची नोंद घेऊनच या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या तपासणी शिबिरामध्ये सुमारे 225 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मोतीबिंदूचे 52 रुग्ण आढळून आले. त्यापैकी 25 रुग्णांना शासकीय वाहनाने नेत्र विभागात आणून रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली तसेच त्यांना त्यांच्या गावी शस्त्रक्रियेनंतर परत सोडण्याची व्यवस्था ही शासकीय वाहनांनी करण्यात आली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यात आले. या शिबिरामध्ये जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. चंद्रकांत काटकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल खाडे, तसेच रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000