सातारा प्रतिनिधी । लाेकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. मतदारांनी मतदानाचा शंभर टक्के हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत निवडणूक आयोगामार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने फलटणचा विधानसभा मतदारसंघांमध्ये श्रीराम बाजार फलटण येथे मतदार जनजागृती मेळावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोरडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विनोद पवार, गटविकास अधिकारी एस. के. कुंभार, स्वीप नोडल अधिकारी सचिन जाधव उपस्थित होते. दरम्यान मतदार जनजागृती मेळाव्यामध्ये श्रीराम बाझार मधील अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि ग्राहक उपस्थित होते. मेळावा यशस्वी होण्यासाठी नोडल अधिकारी स्वीप कक्ष सचिन जाधव व स्वीप टीम यांनी परिश्रम घेतले.
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये फलटण तालुक्यातील मतदान जनजागृतीबाबत उल्लेखनीय कामामुळेच मतदानाचा टक्का जिल्ह्यात वाढला. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील, असा विश्वास याशनी नागराजन यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी “आपले मत आपले भविष्य” व “मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो” तसेच “माय व्होट माय ड्युटी” या घोषणा यावेळी देण्यात आल्या. सर्वांनी मतदानात भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. उपस्थित महिलांनी मतदान हक्क बजावण्याबाबत यावेळी प्रतिज्ञा घेतली.