जिल्हा परिषदेच्या सीइओंंनी 2670 शाळांच्या मुख्याध्यापकांशी साधला संवाद; ‘या’ केल्या महत्वाच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । जिल्हा परिषद शाळांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी व शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सातारा जिल्ह्यातील एकूण २ हजार ६७० शाळांच्या मुख्याध्यापकांशी नुकताच ऑनलाइन संवाद साधला. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असून गुणवत्ता विकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा, अशा महत्वाच्या सूचना नागराजन यांनी यावेळी केल्या.

यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन आडे यांनी देखील संवाद कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी नागराजन म्हणाल्या की, आदर्श शाळा उपक्रम राज्यामध्ये राबविण्यात सातारा जिल्हा रोल मॉडेल ठरेल. ‘माझी शाळा- आदर्श शाळा’ या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या २२३ शाळा विकसित करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी आणि अध्ययनपूरक वातावरण निर्मितीसाठी भौतिक सोयीसुविधा महत्त्वाच्या आहेत, सर्व शाळांमध्ये दर्जेदार सोयीसुविधा असाव्यात यासाठी यावर्षी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे.

आरोग्यच्या सोयी सुविधांच्या दृष्टीने स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. शाळेच्या विकासासाठी गावाचा सहभाग महत्त्वाचा आहे, यासाठी ‘माझी शाळा आदर्श शाळा’ उपक्रम शाळांमध्ये राबवण्यात येत आहे. सोयीसुविधांसाठी सर्व उपलब्ध निधींचा वापर करण्यात येणार असल्याचे नागराजन यांनी स्पष्ट केले.

यावेळी शबनम मुजावर म्हणाल्या, स्पर्धा परीक्षा गुण विकसित होण्यासाठी सर्व शिक्षकांना दिशा देण्यासाठीचा उपक्रम जिल्हा परिषद राबवत आहे. दर शनिवारी दप्तराविना शाळा म्हणजे आनंददायी शनिवार उपक्रमाचे नियोजन तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रमाची अंमलबजावणी सर्व शाळांमध्ये करण्यात येणार आहे. त्यामध्ये शैक्षणिक साहित्य निर्मिती, आनंददायी अभ्यासक्रम, प्रज्ञाशोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग, सराव चाचण्या, ज्ञानचक्षु वाचनालय व प्रयोगशाळा सक्षमीकरण यासारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास करण्याचे नियोजन केले आहे.

या’ केल्या महत्वाच्या सूचना

१) लोकसहभागातून काही सुविधा उपलब्ध करणे
२) शाळेची स्वागत कमान तसेच वॉल पेंटिंग करणे
३) डीजिटल क्लासरूमची निर्मिती करणे
४) संगणक उपलब्ध करणे यांचा त्यात समावेश करणे
५) शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी अभ्यासगटांची निर्मिती करावी
६) गुणवत्ता विकास कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी