कालेत रविवारी होणार कुस्त्यांचे जंगी मैदान; नामवंत पैलवान थोपटणार दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । काले ता. कराड येथे रविवार, दि. १० रोजी व्यंकनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पैलवान नानासाहेब पाटील मित्रमंडळाच्या वतीने निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. मैदानात दीपक लोखंडे यांच्या वतीने प्रथम क्रमांकासाठी २ लाख रुपयांचा बक्षिसाची प्रकाश बनकर विरुद्ध माऊली कोकाटे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील यांच्या प्रेरणेने व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कुस्ती मल्ल व शौकिनांची मैदानात मांदियाळी पाहायला मिळणार आहे, अशी माहिती पैलवान नानासाहेब पाटीले मित्रपरिवार व कराड तालुका कुस्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली.

काले येथे होणाऱ्या कुस्त्यांच्या जंगी मैदानावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील-उंडाळकर, शिवराज मोरे, मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, राजेंद्र देशमुख, पैलवान चंद्रहार पाटील, जयवंतराव जगताप, गजानन आवळकर, निवास थोरात, नरेंद्र पाटील, संभाजी चव्हाण आदींची उपस्थिती असणार आहे.