कराड प्रतिनिधी | संतोष गुरव
हेलसिंकी येथे जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर गावचे पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताला 1952 साली कांस्यपदक मिळवून दिले. त्यावेळी करण्यात आलेल्या पदक वितरण समारंभाची चित्रफीत 71 वर्षांनी जागतिक ऑलिम्पिक संघटनेने नुकतीच प्रसारित केली आहे.
कराड तालुक्यातील गोळेश्वर गाव असलेल्या खाशाबा जाधव यांच्या नावाने सुरू होणाऱ्या कुस्ती संकुलाचे काम अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यांच्या जीवनावर आधारित ‘ खाशाबा ‘ हा चित्रपट लवकरच प्रसारित होणार आहे. चित्रपट सृष्टीने पैलवान खाशाबा जाधव यांच्या कार्याची दखल घेतली. मात्र, 71 वर्षे झाली तर अद्याप केंद्र सरकारकडून त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही.
आता जागतिक ऑलिम्पिक संघटनेने नुकतीच त्यांना पदक वितरित करतानाची चित्रफीत जारी करून मोठा सन्मान दिला आहे. संघटनेने प्रसारित केलेल्या या चित्रफितीत खाशांबा जाधव (कांस्य) यांच्यासह सुवर्णपदक विजेता मल्ला शोहासी इही (जपान) व रौप्य पदक विजेता मल्ला रशीद मामाडेयों हेही दिसत आहेत. जगातील ऑलिम्पिक संघटनेकडून पैलवान खाशाबा जाधव यांच्या त्या सुवर्ण क्षणाचा व्हिडीओ प्रसारित करून संघटनेने पैलवान जाधव यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे.
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांचा ‘ त्या ‘ सुवर्ण क्षणांचा व्हिडिओ अखेर 71 वर्षांनंतर जगासमोर ! pic.twitter.com/6u5e6RNdt2
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 24, 2023
ही तर आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट : रणजित जाधव
पैलवान खाशांबा जाधव यांच्या ७१ वर्षापूर्वीची चित्रफीत जागतिक ऑलिम्पिक संघटनेने प्रसारित केल्यानंतर याविषयी खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना म्हंटले कि, हि तर आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. वडिलांच्या कार्याची दखल घेतली होती. गुगलने यापूर्वी सर्वप्रथम गुगलने वडिलांचे डुडल ठेवून सन्मान केला. त्यानंतर जागतिक ऑलिम्पिक संघटनेने पदक वितरणाची चित्रफीत जारी करून वडिलांचा जागतिक स्तरावर सन्मान केला आहे. याशिवाय आता निर्माते नागराज मंजुळे हे देखील वडिलांच्या जीवनावर आधारित ‘खाशाबा’ हा चित्रपट बनवित आहेत. चित्रफितीबरोबरच स्पर्धेचीही चित्रफीत जारी करावी, अशी आम्ही मागणी करत असल्याचे रणजित जाधव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना म्हंटले.