कर्करोगाविरुद्ध लढ्याच्या पाठिंब्यासाठी ‘कृष्णा’मध्ये सह्यांची मोहिम; शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

0
190
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक कर्करोग दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी कर्करोगाविरुद्धच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सह्यांची मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत कृष्णा विश्व विद्यापीठातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी स्वत:ची सही करत या मोहिमेचा प्रारंभ केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, देशात आणि जगात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी कर्करोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनप्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये गेल्या ३५ वर्षांपासून कर्करोग विभाग कार्यरत असून, याठिकाणी आत्तापर्यंत ३० हजारांहून अधिक कर्करोग रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

वेळीच निदान करून उपचार केल्यास कर्करोग बरा होऊ शकतो. त्यामुळे कर्करोगाला घाबरून न जाता संभाव्य लक्षणे जाणवू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कृष्णा हॉस्पिटलमधील कॅन्सर सेंटर हे दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे सेंटर असून, याठिकाणी पॅलिएटीव्ह केअरचीही सुविधा उपलब्ध आहे. येत्या वर्षभरात कृष्णा हॉस्पिटलच्या कॅन्सर सेंटरमधील सुविधा दुप्पट करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, आंतरराष्ट्रीय व्यवहार उपसंचालिका अर्चना कौलगेकर, कृष्णा हॉस्पिटलचे मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, कर्करोग विभागप्रमुख डॉ. आनंद गुडूर, डॉ. रश्मी गुडूर, वैद्यकीय विज्ञान विभागाच्या अधिष्ठाता डॉ. युगंतरा कदम, दंतविज्ञानचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी., नर्सिंग विज्ञानच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव आदी मान्यवरांसह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘कृष्णा’त महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबीर

जागतिक कर्करोग कर्करोग दिनाच्या औचित्याने कृष्णा हॉस्पिटलमध्ये १ ते २८ फेब्रुवारीपर्यंत महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मॅमोग्राफी, सोनोमॅमोग्राफी (अल्ट्रासाऊंड), थर्मोलिटिक्स (थर्मोग्राफी) अशा चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. तरी महिलांनी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत कृष्णा हॉस्पिटलच्या कर्करोग विभागात संपर्क साधावा, असे आवाहन कर्करोग विभागप्रमुख डॉ. आनंद गुडूर यांनी केले आहे.