कराड प्रतिनिधी । कराड – मलकापूर येथील कृष्णा विश्व विद्यापीठात कोल्हापूर येथील जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या व्हाईट आर्मी ग्रुपच्या सहकार्याने आपत्ती व्यवस्थापन विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी आपत्ती काळात स्वत:च्या व इतरांच्या बचावासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली.
कृष्णा विद्यापीठाच्या मनुष्यबळ संसाधन विभागाच्यावतीने आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक कुलसचिव अस्मिता देशपांडे, मनुष्यबळ व्यवस्थापक विक्रम शिंदे, व्हाईट आर्मी रेस्क्यू फोर्सचे व्यवस्थापक प्रशांत शेंडे, स्वयंसेवक विनायक भाट उपस्थित होते.
यावेळी माशाळकर म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनाचे महत्व अनन्यसाधारण आहे. नैसर्गिक आपत्तीत प्रत्येकाची भूमिका मोलाची असते. पूर, भूकंप अशा आपत्तीच्या काळात स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचविण्यासाठी काय करता येईल, याचे प्रशिक्षण प्रत्येकाने घेण्याची गरज आहे.
आपत्ती येण्यापूर्वीच प्रत्येकाने सावध राहिले पाहिजे, असे सांगत प्रशांत शेंडे यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आपत्ती काळात घ्यावयाच्या काळजीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. व्हाईट आर्मीचे स्वयंसेवक शैलेश रावत, सृष्टी पाटील, तेजश्री कुलकर्णी, सानिका परीट यांनी त्यांना सहकार्य केले. चेतन गोरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कृष्णा विद्यापीठ व कृष्णा हॉस्पिटलच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.