सातारा प्रतिनिधी | सर्वसामान्य समाजाशी थेट जोडलेल्या एसटी कोरेगाव आगारामध्ये आज मतदान जनजागृती उपक्रम घेण्यात आला. यावेळी कोरेगाव आगारातील वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे मतदानाची शपथ घेतली आणि लोकशाही अधिक बळकट करण्याचा निर्धार केला.
यावेळी वर्कशॉप विभागाचे प्रमुख शुभम ढाणे ,वर्कशॉप मधील कर्मचारी तसेच जनजागृती पथकाचे प्रमुख यशेंद्र क्षीरसागर, पथकाचे सदस्य मंगेश घाडगे उपस्थित होते.
यावेळी या कर्मचाऱ्यांना मतदानाचे महत्त्व आणि मतदानाची लोकशाहीतील भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. श्री. क्षीरसागर म्हणाले,” समाजातील सर्व घटक लोकशाहीला बळकट करण्यासाठी पुढे यावेत. यासाठी प्रशासनाचे मोठे प्रयत्न चालू आहेत.
शंभर टक्के मतदान करून आपला मतदानाचा पवित्र अधिकार बजावावा. मतदान हा केवळ अधिकार नसून ते आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे .राज्यघटनेत सांगितलेली समता, बंधुता, सामाजिक न्याय इत्यादी मूल्ये जर चिरंतन ठेवायची असतील तर जास्तीत जास्त मतदान करून देशाच्या विकास, समृद्धी आणि संस्कृती संवर्धनात भाग घ्यायला हवा. एसटी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी मतदान स्वतः करावेच परंतु त्यासोबत जागृती देखील करावी”.श्री. ढाणे यांनी या उपक्रमाबद्दल प्रशासनाचे आभार मानले.