कामगारांच्या PF, SIचे पैसे वळवले प्रेयसीच्या खात्यावर, संशयिताला अटक अन् पोलिस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | एका कंपनीत पर्यवेक्षक आणि अकाउंटचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याचा कारनामा समोर आला आहे. त्याने कंपनीच्या कामगारांचे पीएफ आणि एसआयचे १५ लाख रुपये चक्क आपल्या प्रेयसीच्या बॅंक खात्यावर वळवले.. ही घटना उघडकीस आल्यानंतर मंगेश रमेश दुदकर (रा. संगमनगर, सातारा) याला फसवणुकीचा गुन्ह्यात सातारा शहर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

सातारा शहराजवळील धनगरवाडी-कोडोली येथील एका कंपनीच्या कामगारांची पीएफ आणि एसआयची १५ लाख रुपयांची रक्कम पर्यवेक्षक मंगेश दुदकर याने प्रेयसीच्या बॅंक खात्यावर पाठवून मोठी फसवणूक केल्याचा प्रकार कंपनी व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर पर्यवेक्षक आणि त्याच्या प्रेयसीवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पर्यवेक्षकाला अटक केली आहे. तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

सोमनाथ रामचंद्र किर्दत (रा. चिंचणेर निंब, ता. सातारा) यांनी यासंदर्भात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. तक्रारीनुसार दि. २ नोव्हेंबर २०२२ पासून १४ जानेवारी २०२४ पर्यंत संबंधित कंपनीत फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे. पर्यवेक्षक आणि अकाऊंटचे काम पाहणाऱ्या मंगेश दुदकर याने कंपनीच्या बॅंक खात्यातील पीएफ आणि एसआयचे १५ लाख रुपये कामगारांच्या खात्यावर जमा न करता ते प्रेयसीच्या बॅंक खात्यावर वळते केले. तसेच ती रक्कम कामगारांच्या खात्यावर ऑनलाईन पाठविल्याच्या खोट्या पावत्याही केल्या. त्यामुळे मंगेश दुदकर आणि त्याच्या प्रेयसीविरोधात फसवणुकीची तक्रार देण्यात आली.

याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मंगेश दुदकर याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक शिरोळे हे तपास करीत आहेत.