सातारा प्रतिनिधी | गणेशोत्सव व ईद सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी साताऱ्यात प्रशासनाच्या वतीने नुकतीच शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. मात्र, ही बैठक शांततेत होण्याऐवजी वादावादीनेच गाजली. या बैठकीतच दोन राजकीय गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत खासदार उदयनराजेंच्या कार्यकर्त्याला बाहेर नेऊन त्याची समजूत घातली. मात्र, बैठकीत काहीकाळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.
बैठकीच्या सुरूवातीलाच साताऱ्यातील एका वादग्रस्त विषयावरून खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक अमोल तांगडे आणि शिवसेनेच्या (उबाठा गट) नरेंद्र पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. वाद आणखी वाढू नये म्हणून अमोल तांगडे यांना सभागृहाच्या बाहेर नेऊन त्यांची समजूत काढण्यात आली. शांतता कमिटीची बैठक ही वादावादीचे ठिकाण नसून या ठिकाणी तरी संयमाने वागा, असे पोलीस अधिकाऱ्यांना सांगावे लागले.
सातारा जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी विविध पक्षाचे राजकीय नेते व काही व्यक्तींच्या अरेरावीपणामुळे या शांतता बैठकीला गालबोट लागले. सातारा शहरातील पोलीस दलाच्या अलंकार सभागृहात सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, मुस्लीम बांधव व प्रशासकीय अधिकारी यांची शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती. यावेळी पोलीस अधिक्षक समीर शेख, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण सूर्यवंशी यांच्यासह पोलीस दलातील तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, मंडळांचे पदाधिकारी, सातारा शहर व तालुक्यातील काही गावातील हिंदू-मुस्लीम बांधव उपस्थित होते.
साताऱ्यात शांतता कमिटीच्या बैठकीतच राडा; पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप
🧐 नेमकं काय घडलं पहा Video👇 pic.twitter.com/c4i9JRqUoZ
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 2, 2023
सातारा जिल्ह्यामध्ये कायदा व संस्थेच्या प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. त्यामुळे सार्वजनिक सण आनंदाने साजरा करण्यापेक्षा भीतीचे वातावरण पसरले आहे. यावर पूर्वी कडक उपाययोजना सातारा जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनामार्फत केले जात होते. पण अलीकडच्या काळात बोटचेपी धोरणामुळे जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासनास सहकार्य करून गणेशोत्सव व ईद सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना करावे लागले आहे.
सदरचे वादावादीचे चित्रीकरण काही प्रसारमाध्यमाने केल्यामुळे सातारा जिल्हा प्रशासन, पोलीस दलाच्या शांतता कमिटी मध्ये काय चालले आहे ? याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आहे .परंतु, सातारकरांनी कायदा व सुव्यवस्था राखून शांततेमध्येच सार्वजनिक उत्सव साजरे करावेत. याबाबत आता स्वयंशिस्तीने शांतता प्रिय नागरिकांनी नियम पाळावेत. असे आता सूचित करावे वाटत आहे. अशी प्रतिक्रिया जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.