कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील एका कंपनीत व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाने २४ वर्षीय युवकाचा खांद्यापासून हात निखळून पडल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पाटण तालुक्यातील डेरवण येथील युवकाने कंपनीचे मालक व मॅनेजर विरोधात तळबीड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
एमआयडीसीतील प्रताप इंडस्ट्रीमध्ये सप्टेंबर २०२३ मध्ये ही घटना घडली असून, उपचारानंतर युवकाने कंपनीचे मालक व मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद अक्षय कृष्णत जाधव (वय २४) यांनी दिली आहे. कंपनी व्यवस्थापनाने निष्काळजीपणे जाणून-बुजून कंपनीतील रोलर मशिनचे ऑपरेटरचे काम येत नसताना व कधीही त्या मशिनवर काम केलेले नाही. याबाबत व्यवस्थापनाला माहीत होते. त्यात फिर्यादीने या कामास नकार देऊनही त्याला काम करण्यास भाग पाडले.
दरम्यान, हात मशिनच्या पट्ट्यामध्ये सापडून खांद्यापासून तुटून बाजूला पडला. हात तुटून पडल्याने गंभीर दुखापत झाली. त्यामुळे अक्षय याने कंपनीचे मालक व मॅनेजर यांना कारणीभूत ठरवले. त्यावरून फिर्याद देण्यात आली आहे.