सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील खेड येथे भंगार दुकानात काम करणार्या दोन कामगार मित्रांची दारू कमी दिल्याच्या कारणातून हाणामारी होऊन त्यात एकाचा खून झाल्याची घटना घडली. सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घातल्याने जगन्नाथ दगडू पवार (वय 60, रा. केसरकर पेठ, सातारा) यांचा मृत्यू झाला. दरम्यान, संशयित जखमी असून त्याच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत.
तुकाराम वैजनाथ पवार (वय 40, सध्या रा. खेड, सातारा मूळ रा. बामणेवाडी, जि. धाराशिव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली असून शुक्रवारी पहाटे खुनाची माहिती समोर आली. याप्रकरणी प्रशांत नानाजी कांबळे (वय 32, रा. गडकर आळी, शाहूपुरी) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते भंगार दुकान मालक आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, जगन्नाथ पवार हे गेल्या सहा वर्षांपासून भंगार दुकानात काम करत होते. ते दुकानाबाहेरील शेडमध्येच स्वत: स्वंयपाक करुन राहत होते. गेल्या वर्षापासून तुकाराम पवार हा देखील त्याच भंगार दुकानात कामाला लागला होता. तो जगन्नाथ यांच्यासोबतच राहत होता. दि. 3 जून रोजी रात्री भंगार दुकान मालकाने दुकान बंद केल्यानंतर दोन्ही कामगार नेहमीप्रमाणे रात्री शेडमध्ये दारु पिण्यास बसले.
यावेळी जगन्नाथ यांना दारु कमी आल्याने त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यामुळे तुकाराम पवार चिडला. यातून दोघांची वादावादी होवून हाणामारी झाली. दोघेही जखमी झाले असतानाच चिडलेल्या तुकाराम याने जगन्नाथ पवार यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला. यामुळे ते रक्तबंबाळ झाले व निपचित जाग्यावर पडले. यानंतर तुकाराम पवार याने पहाटे बाहेर येवून शेजारी राहत असणार्यांना घटनेची माहिती दिली. शेजार्यांनी भंगार दुकान मालकाला फोन करुन बोलावून घेतले. दुकान मालकाला जगन्नाथ पवार हे रक्ताच्या थारोळ्यात पडले दिसले. तुकाराम पवार उपचारासाठी दाखल झाला असल्याचे समजले. पोलिसांनी पंचनामा करुन सकाळी खुनाचा गुन्हा दाखल केला.