पंतप्रधानांसह रेल्‍वेमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ‘या’ रेल्‍वेमार्गांच्या कामाचा होणार श्रीगणेशा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक रेल्वेमार्गाची कामे केली जात आहेत. त्यामध्ये काही जुनी आहेत. मात्र, जिल्ह्यातील फलटण-बारामती आणि फलटण-पंढरपूर या दोन्ही रेल्वेमार्गांच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात मार्च महिन्‍याच्‍या पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रेल्‍वेमंत्री अश्‍विनी वैष्‍णव उपस्‍थित राहणार असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

लोणंद- फलटण रेल्वेमार्ग व फलटण रेल्वे स्थानकाची पाहणी केल्यानंतर रेल्वे स्थानकावर खा. निंबाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मध्‍य रेल्वे सरव्‍यवस्‍थापक रामकरण यादव, बांधकाम विभाग प्रशासन अधिकारी अविनाशकुमार पांडे, पुणे विभागाच्‍या व्‍यवस्‍थापक श्रीमती इंदू आर. दुबे, गती शक्ती पुणे विभाग मुख्य प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक राजेश उपाध्याय यांच्‍यासह विविध अधिकारी व ठेकेदार, तसेच सदस्य संचालक, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

खा. रणजितसिंह म्हणाले की, ‘‘लोणंद येथून फलटण पर्यंत आणि बारामती या ५६ किलोमीटर अंतरातील रेल्वे मार्गापैकी लोणंद- फलटण रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होऊन त्यावरून फलटण – पुणे मार्गावर प्रत्यक्ष वाहतूक सुरू झाली; पण फलटण- बारामती मार्गाचे काम गेल्या २०/२२ वर्षांपासून रखडले होते. ते आता सुरू होत आहे. आपण सतत पाठपुरावा केल्याने फलटण- बारामती मार्गाचे भूसंपादन पूर्ण होऊन आता या मार्गाचे आराखडे, अंदाजपत्रक तयार होऊन त्याला मंजुरी मिळाल्यानंतर टेंडर प्रसिद्ध होऊन ठेकेदार निश्चित झाले आहेत. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे.

मुदतीत काम पूर्ण होऊन या मार्गावरूनही एप्रिल २०२६ अखेर प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर रेल्वेने थेट दिल्लीला जाण्याचे फलटणकर नागरिकांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. दरम्यान, वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी खा. निंबाळकर यांच्यासमवेत फलटण- बारामती प्रस्तावित रेल्वेमार्गाची पाहणी केली. या मार्गावर नीरा नदीवर उभारण्यात येणाऱ्या रेल्वे पुलाच्या जागेची पाहणी संबंधित ठेकेदारांसमवेत करण्यात आली.