साताऱ्यात मनुस्मृतीचे दहन करून स्त्रीमुक्ती दिन साजरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर, १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन केले होते. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ सातारा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. तसेच मनुस्मृती दहन हाच स्त्रीमुक्ती दिन म्हणूनही साजरा करण्यात आला.

यावेळी वंचितच्या जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, जिल्हा उपाध्यक्षा चित्रा गायकवाड, शहराध्यक्षा माया कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चित्रा गायकवाड म्हणाल्या, देशातील सर्व जातींच्या तीं महिलांना माणूस म्हणून जगण्याचा व समानतेचा हक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला. मनुस्मृती दहन हा दिवस खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती दिवस आहे. या दिवशीच स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. शहराध्यक्षा मायाताई कांबळे म्हणाल्या, मनुस्मृती ग्रंथाने छत्रपती शिवाजी महाराजांचाही राज्याभिषेक नाकारला होता. माणसाला माणूस म्हणून हीन वागणूक देणाऱ्या या ग्रंथाचे दहन डॉ. आंबेडकरांनी करून आपल्याला न्याय हक्क मिळवून दिला.

यावेळी जिल्हा युवा महासचिव सायली भोसले, बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या प्रतीक्षा कांबळे, समाधान कांबळे, प्रमोद क्षीरसागर आदींनी स्त्रीमुक्तीबाबत सविस्तर माहिती कथन केली. शहराध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी प्रास्ताविक केले. गौरव भंडारे यांनी आभार मानले. प्रारंभी बाबासाहेब यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमास शहर उपाध्यक्षा पल्लवीताई काकडे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.