सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव पुढे सरसावले असताना आता महिलांनी देखील आरक्षणासाठी वज्रमुठ आवळली आहे. साताऱ्यातील रणरागिनींनी शुक्रवारी सायंकाळी दुचाकी रॅली काढून साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शविला. यावेळी देण्यात आलेल्या ‘एक मराठा..लाख मराठा’ या घोषणेने शहर दणाणून गेले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे सुरू केलेले उपोषण स्थगित केले असले तरी साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. साताऱ्यातही दहा दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपोषण सुरू आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून शुक्रवारी महिलांकडून दुचाकी रॅली काढण्यात आली.
सायंकाळी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून या रॅलीस प्रारंभ झाला. दुचाकीला लावलेले भगवे झेंडे, भगव्या टोप्या व फेटे परिधान करून रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी ‘एक मराठा.. लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी.. जय शिवाजी, आरक्षण आमच्या हक्काचं.. नाही कोणाच्या बापाच्या’ अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले.