आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनी कचरा वेचक महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । कचरा वेचकांना हॅन्ड ग्लोव्हज, बूट, मास्क इत्यादी सुविधा मिळाव्यात, जिल्ह्यातील समाज कल्याण खात्याने कचरा व्यवस्था महिलांच्या मुलांना मॅट्रिक वर्ष शिष्यवृत्ती वेळेत द्यावी यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी अवनी संस्था संचलित कचरा वेचक संघटनेच्या वतीने कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेतील महिलांनी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.

यावेळी संघटनेच्या महिलांनी आक्रमक पावित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. काही महिलांनी तर आपल्या भावना आक्रमकपणे माध्यमांसमोर मांडल्या. जिल्ह्यामध्ये ५०४ कचरावेचक महिलांचे संघटन आहे. गेल्या आठ वर्षांपासून हे संघटन कचरा वेचकांसाठी संघर्ष करत आहे. त्यांना कामाचा योग्य तो मोबदला मिळावा आदींसह विविध मागण्यांसाठी संघटनेतील महिलांनी आक्रमक पावित्रा घेतला.

यावेळी कचरा वेचकांची नोंदणी होऊन त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्यात यावी, कचरा वेचकांच्या मुलांना पूर्व प्राथमिक स्वच्छता व्यवसाय शिष्यवृत्ती जाहीर केली जावी, राज्य पातळीवरील स्वच्छता व्यवस्थापन सल्लागार मंडळावर कचरा वेचणाऱ्यांचे प्रतिनिधी नियुक्त करावे, राज्यात कचरा वेचकांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, अशा विविध मागण्या प्रशासनाने लवकरात- लवकर मान्य कराव्यात, अशा मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना देण्यात आले.