सातारा प्रतिनिधी | सातारा शहर परिसरात यावर्षी गणरायाचे काल दिमाखदार आगमन झाले. आता सर्व महिलांना वेध लागले आहे ते मंगळवारी येणाऱ्या गणपतीच्या बहिणी ज्येष्ठा व कनिष्ठा गौरीच्या स्वागताचे होय.
सातारा शहरातील सदाशिव पेठ , खणआळी, मोठी चौक परिसर विविध विक्रेत्यांच्या साहित्याने सजवून गेला असून ही साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांचाही तितकाच उत्साह दिसत आहे. गौरीना लागणारे विविध दाग- दागिने खरेदीसाठी तसेच गौरीपुढे मांडण्यात येणाऱ्या विविध फराळाचे पदार्थाचे खरेदीसाठी महिलांची धांदल उडाली आहे. यामुळे रस्ते महिलांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.
काही वर्षांपर्यंत महिला घरोघरी फराळाचे पदार्थ करून ते गौरीपुढे मांडत असतात. मात्र, सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये विविध तिखट आणि गोड प्रकारचे फराळाचे पदार्थ महिला या छोट्या स्वरूपात पॅकेट वजा तयार मिठाई विक्रेत्यांकडून खरेदी करून त्या गौरीपुढे मांडण्याचा कल वाढीस लागला आहे. त्यामुळे असे विविध खाद्यपदार्थ आणि फराळाचे पदार्थ असणारे स्टॉल सध्या खण आळी आणि सदाशिव पेठ मध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत.
यामध्ये लाडू, चिवडा ,बर्फी, म्हैसूर पाक ,बालुशाही ,सुतरफणी विविध प्रकारचे माव्याचे मोदक ,अंबा बर्फी ,कलाकंद, गुलाबजाम ,लसूण शेव, तिखट शेव, पालक शेव, भावनगरी, गाठी, साखरगाठी ,गोड शेव आधी प्रकार येथे पॅकेट स्वरूपात बनवून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. सर्वात कमी वजनाच्या असे वीस रुपयाचे प्रत्येकी एक नग असे पाकीट महिला खरेदी करताना दिसत असून गौरीपुढे या फराळाची डिश सजवण्यामध्ये एक विशेष उत्साह दिसून येतो.
अनेक गणेश मंडळांनी गौरी पुढे मांडण्यात येणाऱ्या पदार्थांच्या सजावट स्पर्धा ही आयोजित केल्या असून त्यालाही महिलांचा विशेष उत्साह आणि नोंदणीसाठी प्रतिसाद मिळत आहे. सध्या उत्सवामुळे शेवंती, गुलाब, निशिगंध, झेंडू या फुलांनाही मोठी मागणी असून फुलांची कमतरता पडत असल्यामुळे कृत्रिम फुलांचे गुच्छ खरेदी करतानाही महिलांची विशेष गर्दी दिसत आहे.