सातारा प्रतिनिधी | पुणे येथील नातेवाईकाच्या
अंत्यविधीला जात असताना पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून कारने जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर पाचजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना मंगळवारी,दि.१ रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारे शेंद्रे, ता. सातारा येथे घडली.
दरम्यान, अपघातग्रस्त सांगली आणि चिपळूणमधील रहिवासी असून त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विठ्ठल गोविंद तारळेकर (वय ७६) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर पूजा नितीन तारळेकर (३०), त्यांचा मुलगा देवांश नितीन तारळेकर (वय अडीच वर्ष), नितीन विठ्ठल तारळेकर (३६, सर्व रा. झुलेलाल चौक, सांगली), राजेश्वरी महेंद्र लोकरे (१६), विरधवल महेंद्र लोकरे (रा. निवळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, हे सर्वजण सांगलीवरून कारने (एमएच १० बीएम ४२४८) ने पुण्यातील नातेवाईकाच्या अंत्यविधीला निघाले होते. यावेळी नितीन तारळेकर हे कार चालवत होते. त्यांची कार शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीत आली असता महामार्गाच्या कडेला अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला कारची पाठीमागून जोरात धडक बसली. यामध्ये विठ्ठल तारळेकर यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. तर इतर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.