विटांनी भरलेली ट्रॉली अंगावरुन गेल्यान ‘त्याच्या’ डोळ्यादेखत ‘तिचा’ झाला मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शिंगणापूर-दहिवडी घाट महामार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ विटांनी भरलेली ट्रॉली महिलेच्या अंगावरुन गेल्याने महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. रंजना वाघमारे (मूळ रा. नांदेड, सद्या रा. मांडवे, ता. माळशिरस) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मांडवे (ता. माळशिरस) या ठिकाणाहून विटांनी भरलेल्या दोन ट्रॉली असलेला ट्रॅक्टर (क्र.एमएच ११ यु ८८३०) हा दहिवडीच्या दिशेने जात होता. घाट असल्याने ट्रॅक्टरमध्ये भरपूर लोड असल्याने महिला आणि तिचा पती हे दोघे ट्रॅक्टरमधून उतरून चालत जात असताना विटांनी भरलेली ट्रॉली अंगावर आल्याने महिला जागीच ठार झाली. यात सुदैवाने तिचा पती बचावला आहे. ट्रॅक्टरचे मालक अमोल माने व संतोष माने हे दोघेही (रा. मांडवे, ता. माळशिरस) असून तेच चालक आहेत.

रंजना वाघमारे (मूळ रा. नांदेड, सद्या रा. मांडवे, ता. माळशिरस) असे मृत महिलेचे नाव आहे. ती मांडवे येथील वीटभट्टीवर कामाला होती. हा अपघातस्थळी वावरहिरे येथील नागरिकांनी गर्दी केली होती. पोलीस पाटलांनी दहिवडी पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क साधून माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याच दरम्यान पोलीस पाटील यांनी रुग्णवाहिकेला केलेल्या संपर्कानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली होती. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दहिवडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दहिवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.