कराड प्रतिनिधी । वन क्षेत्रातील गुन्हे उघडकीस आणणे व वनसंरक्षण, वनसंवर्धन, जनजागरण यामध्ये कराडचे मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत मंगळवारी स्वातंत्र्यदिनी कोल्हापुरात वन विभागाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.
कोल्हापुरात मंगळवारी वन विभागाच्या वतीने स्वातंत्र्यदिन व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्र मधील कोल्हापूर,सातारा,सांगली, रत्नागिरी,सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील वनविभाग मधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांचे गौरव करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर परिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक श्री. आर. एम. रामानुजम, उपवनसंरक्षक कोल्हापूर जी. गुरु प्रसाद, उपवनसंरक्षक श्री. पद्मनाभ, विभागीय वनाधिकारी कोल्हापूर श्रीकांत पवार, विभागीय वनाधिकारी (दक्षता) भुर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमप्रसंगी सातारा जिल्ह्यातील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना सेवा कार्यकालामध्ये वनगुन्हे उघडकीस आणणे, व वनसंरक्षण,वनसंवर्धन, जनजागरण यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक श्री. रामानुजम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.