थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणीतील वणव्यात होरपळल्या डोंगररांगा

0
216
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील थंड हवेचे ठिकाणी असलेल्या पाचगणी येथे अंजुमन स्कूल परिसरात दुपारी अज्ञाताने लावलेल्या आगीने डोंगररांगा, येथील झाडे वेली आगीच्या विळख्यात सापडल्या. हा वणवा भडकल्याने धुराचे लोट, सर्वत्र आगीच्या ज्वाळा पसरल्या.

वणव्याच्या ज्वाळांनी अनेक पक्ष्यांनी घरटे सोडीत पळ काढला. यावेळी पक्ष्यांचा आक्रोश नजरेस पडला. या वणव्याने सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. पर्यावरण प्रेमींनी वणवा विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, वणव्याची आग मोठी असल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. वीकेंड असल्याने पर्यटनाकरिता वाहने महाबळेश्वर दिशेने जात होती, तर रस्त्याकडेनेच वणव्याची धग जाणवत होती. या वणव्यामध्ये शेकडो वृक्ष वेली, असंख्य वन्यप्राणी होरपळून गेले, तर हजारो एकर क्षेत्रातील वनसंपदा या वणव्याने नष्ट झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून लागत असलेल्या वणव्यानी हा परिसर काळाकुट्ट झाला आहे. कधी वन संपदेने नटलेले डोंगर राखेत परावर्तित झाल्याचे दिसत आहेत. असंख्य जीव जंतू या वणव्याच्या भक्षस्थानी पडत आहेत. वन विभागाने शोध घेत अशा विघ्नसंतोषी व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी मधून केली जात आहे.