कास पठार फुलांनी बहरले; पर्यटकांसह रानगव्यांचा वाढला वावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा कास पठारावर (Kas Plateau) मनमोहक फुलांचा गालिछा बहरला आहे. देशविदेशातील पर्यटकांना या पठारावरील अनेक फुले खुनावू लागले आहे. रविवारी कास पुष्प पठार पहावयास आलेल्या पर्यटकांना कास पठारानजीक फुलांसह रानगव्यांचे दर्शन झाले. त्यामुळे कास पठारावर गव्यांचा वावर असल्याचे दिसून आले आहे.

कास पठारावर पुष्प हंगाम सुरू झाला असून पुष्प पठार रानफुलांनी चांगलेच भरले आहे. पठारावरील फुले पाहण्यासाठी महाराष्ट्रासह देश विदेशातील पर्यटक पठारावर गर्दी करू लागले आहेत. शनिवार, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने ऑनलाईन बुकिंग अगोदरच कास पठार फुल्ल झाल्याने पर्यटकांची एकच तारांबळ उडाली. ऑफलाईन येणार्‍या पर्यटकांची देखील संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून आले.

रविवारी सकाळी घाटाई फाटा या ठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रानगवे गवत चरताना पहावयास मिळाले. रानगव्यांचा कळप त्या ठिकाणी दिसल्याने पुष्प पठार पाहण्यासाठी जाणार्‍या पर्यटकांनी वाहने घाटाई फाट्यावर मध्येच रस्त्यात थांबवून फोटोसेशन केले. बराच वेळ त्या ठिकाणी ट्राफिक जामची समस्या उद्भवल्याने कास पठार कार्यकारी समितीच्या कर्मचार्‍यांनी वाहने पुढे नेण्यास पर्यटकांना प्रवृत्त केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली.