सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी एक महत्वाचा विधानसभा मतदार संघ म्हणजे सातारा आणि जावळी हा होय. या मतदारसंघाचे नेतृत्व प्रदीर्घ काळ आ. शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale) करत आहेत. पूर्वी राष्ट्रवादीतून तर आता भाजपमधून (Mahayuti) ते आमदार असून येणाऱ्या निवडणुकीत ते निवडणूक लढवणार हे निश्चित आहे. या मतदार संघात तिघा इच्छुकांनी महाविकास आघाडीकडे (Maha Vikas Aghadi) उमेदवारी मागितली असली तरी मात्र, त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी नेमका तगडा गडी देणार? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं तरी महायुती आणि महविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटता सुटेना. एकीकडे जागावाटपाचा तिढा असताना दुसरीकडे सातारा जिल्ह्यात विधानसभेसाठी इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. आता पर्यंत सातारा विधानसभा मतदार संघात शिवेंद्रराजेंच्या विरोधात महाविकास आघाडीमधून दीपक पवार यांच्या नावाची चर्चा आहे. दीपक पवारांनी यापूर्वी अनेकदा शिवेंद्रराजेंना कडवी झुंज दिली आहे.
तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले अमित कदम यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेत त्यांच्याकडे सातारा- जावलीची उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतच उमेदवारीवरून ट्विस्ट तयार झाले आहे. शिवसेना उध्दव ठाकरे गटातून माजी आमदार सदाशिवराव सपकाळ यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. तर जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनीही उमेदवारी मागितली आहे.
महाविकास आघाडीत ही जागा कुणाकडे जाणार हे स्पष्ट झालेलं नाही. 2019 ची निवडणूक लढवणारे दीपक पवार इच्छुक आहेत. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवारांच्या पक्षात सक्रीय झालेले अमित कदम देखील विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. याशिवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिन मोहिते हे देखील तयारी करत आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीत जागा कुणाकडे जाणार हे स्पष्ट झाल्यानं उमेदवार कोण असेल हे लवकरच स्पष्ट होईल.
तीनवेळा राष्ट्रवादीतून विजयी आता दुसऱ्यांदा भाजपकडून निवडणूक रिंगणात
सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसले 2004 निवडणुकीत विजयी झाले होते. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत मतदारसंघ पुनर्रचना करण्यात आली होती. त्यामध्ये सातारा शहर, जावळी तालुक्यतील गावं आणि सातारा जिल्हा परिषदेचे शेंद्रे आणि परळी हे दोन गट मिळून सातारा जावळी विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला. शिवेंद्रराजे भोसले यांनी 2009,2014 आणि 2019 मध्ये या मतदारसंघात विजय मिळवला आहे. पहिल्या तीन निवडणुकांमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. तर, 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदारकीचा राजीनामा देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या चिन्हावर देखील ते विजयी झाले. आता दुसऱ्यांदा भाजपकडून शिवेंद्रराजेनिवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
साताऱ्यात शिवेंद्रराजे तर जावळीत शशिकांत शिंदेची ताकद
सातारा तालुक्यातील परळी, नागठाणे, अतित, कास पठार, कोंडवे, लिंब याठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांना मानणारा गट आहे. याचा त्यांना फायदा होऊ शकतो. तर जावलीत शशिकांत शिंदेंची वैयक्तिक ताकद आहे. जावलीमध्ये शशिकांत शिंदे यांनी दोन वेळा आमदारकी केली आहे. त्यामुळे यांची स्वत:ची वैयक्तिक ताकद आहे. त्यांच्या जोडीला दीपक पवार यांचाही गट असणार आहे. शिवाय सातारा शहरात देखील विधानसभेला दीपक पवार यांना चांगली मते मिळाली होती. ती त्यांच्या सोबत असतील.
२०१४ च्या विधानसभेचा निकाल
१) शिवेंद्रराजे भोसले (राष्ट्रवादी) – ९७,९६४
२) दीपक पवार (भाजपा) – ५०,१५१
३) दगडू सकपाळ (शिवसेना) – २५,४२१
२०१९ च्या विधानसभेचा निकाल
१) शिवेंद्रराजे भोसले (भाजपा) – १,१८,००५
२) दीपक पवार (राष्ट्रवादी) – ७४,५८१
३) अशोक गोरखनाथ दीक्षित (वंचित) – ३१५३