सातारा प्रतिनिधी । नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत साताऱ्यातून काँग्रेस आणि शरद पवारांचा बालेकिल्ला महायुतीने हद्दपार केला आहे. ८ विधानसभा मतदारसंघ असलेल्या या सातारा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व मतदारसंघात महायुतीने आपला विजयी झेंडा फडकवला आणि महाविकास आघाडीला व्हाईटवॉश दिला. साताऱ्यात भाजपचे ४, शिवसेना शिंदे गटाचे २ आणि अजित पवार गटाचे २ आमदार निवडून आले. आता लक्ष लागलं आहे ते सातारा जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांमध्ये कोणाच्या नशिबी लाल गाडी येणार? जिल्ह्याला कोणती खाती मिळणार? अशात जिल्ह्यातील पालक मंत्रीपदासाठी आ. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), आ. शिवेंद्रराजे भोसले (Shivendrasinh Bhonsle), आ. मकरंद पाटील (Makrand Patil), आ. जयकुमार गोरे यांच्या नावाची चर्चा आहे. महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या गुरुवारी पडणार आहे. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर यावेळी काही नेत्यांना देखील मंत्रिपदाची शपथ दिली जाणार का? याबाबत उत्सुकता लागली आहे.
सातारा जिल्ह्यात फिक्स मंत्रिपद मिळणार असं छातीठोकपणे सांगितलं जातंय असं पहिले नाव म्हणजे शंभूराज देसाई. पाटण विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत त्यांनी आमदारकीची हॅट्रिक मारलीय. शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जातात. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृह आणि अर्थ राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती, तर त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात राज्य उत्पादन मंत्री म्हणून त्यांनी अडीच वर्ष काम केलं. संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव शंभूराज देसाईंच्या गाठीशी आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक विषयांवर त्यांचा सखोल अभ्यास आहे. विधिमंडळात विरोधकांच्या आरोपांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याचं कसब सुद्धा शंभूराज देसाईंमध्ये आहे. एकनाथ शिंदेंना कोणत्याही परिस्थितीत साथ देणारे आमदार अशी शंभूराज देसाई यांची ओळख आहे. याशिवाय त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा चांगले संबंध राहिलेत. त्यामुळे शंभूराज देसाई यांना यंदाही मंत्रिपद फिक्स असेल हे नक्की
शंभूराज देसाई यांच्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावाची देखील चर्चा आहे. सलग ५ टर्म साताऱ्याचे आमदार राहीलेल्या शिवेंद्रराजेना यंदा तरी मंत्रिपद मिळावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. शिवेंद्रराजे यांचे बंधू आणि भाजपचा खासदार उदयनराजे भोसले यांनी विधानसभा निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शिवेंद्रराजेंच्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावल्याचं बोललं जातंय. शिवेंद्रराजेंना मंत्रिपद द्या, मी जिल्ह्यात भाजप वाढवतो, असा शब्द उदयनराजेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिला असल्याच्या चर्चा आहेत. मतदारसंघातील विकासकामे, छत्रपती घराण्याचे वलय, कार्यकर्त्यांची मजबूत फळी, स्थानिक स्वराज्य संस्थांवर असलेले एकहाती वर्चस्व हि शिवेंद्रराजे यांची जमेची बाजू आहे.
मंत्रिपदाबाबत तिसरं नाव म्हणजे मकरंद पाटील यांचे खुद्द अजित पवार यांनीच मकरंद पाटलांच्या मंत्रिपदाबाबत थेट संकेत दिले होते. काही दिवसांपूर्वी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आलेल्या अजित पवारांना विचारण्यात आलं होतं कि, सातारा जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदाची संधी आहे का? त्यावेळी अजित पवार यांनी ‘हो आहे,’ अशा शब्दांत साताऱ्याला मंत्रिपदाबाबतचा शब्द जाहीरपणे दिला आहे. साताऱ्यात अजित पवार गटाचे २ आमदार आहेत. एक म्हणजे मकरंद पाटील आणि दुसरे म्हणजे फलटणचे सचिन कांबळे पाटील.
सचिन कांबळे पाटील हे यंदा प्रथमच आमदार झालेत, तर दुसरीकडे मकरंद पाटील यांची आमदारकीची चौथी टर्म आहे. त्यामुळे मकरंद पाटील यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. मागील महायुतीच्या मंत्रिमंडळात मकरंद पाटील यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, शेवटपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने मकरंद पाटील यांना संधी मिळू शकली नव्हती. आता पुन्हा महायुतीची सत्ता आल्याने मकरंद पाटील यांना मंत्रिपद मिळेल असं म्हंटल जातंय.
हि ३ नावे सोडली तर डॉ. अतुल भोसले, जयकुमार गोरे, महेश शिंदे यांना सुद्धा मंत्रिपद देण्यात येईल अशे शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सातारा जिल्ह्याला २ किंवा ३ च मंत्रीपदे मिळणार असल्याने कोणाला मंत्रिपद द्यायचं याचा पेच महायुतीसमोर निर्माण झाला आहे. आता सातारा जिल्ह्यातून कोणाकोणाला लाल दिव्याची गाडी मिळेल? मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल? हे उद्या स्पष्ट होणार आहे.
शपथविधी सोहळा कुठे?
महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी ५ डिसेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. आझाद मैदानात 30 हजारपेक्षा जास्त नागरिक बसतील एवढा मोठा मंडप बांधला जात आहे. तसेच आझाद मैदानावर 100 बाय 100 चं मुख्य स्टेज उभारण्यात येत आहे. त्याच्या बाजूला दोन स्टेज बांधण्यात येत आहे. हा संपूर्ण स्टेज आणि मंडप भगव्या रंगाचे असणार आहे. या सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि देशातील सर्वच राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
शपथविधी सोहळा किती वाजता?
महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याला उद्या संध्याकाळी ५ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळेमुळे कार्यक्रमाचं स्वरूप संक्षिप्त करण्यात आलं आहे. तर इतर मंत्र्यांचा शपथविधीदेखील लवकरच पार पडेल. मुंबईतील राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे.