सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कास, कांदाटी व कोयना खोऱ्यातील परिसर सर्वत्र आकर्षक पांढऱ्या शुभ्र व्हायटी फुलाने बहरला आहे. जैवविविधता लाभलेला सातारा जिल्हा निसर्ग सौंदर्याने सजलेला जिल्हा असून जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार आहे. दरवर्षी कास व आजूबाजूचा परिसर विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी बहरलेला असतो.
चालू वर्षी या परिसरात एक सुंदर फुलांचा आविष्कार अनुभवास मिळत आहे आणि तो म्हणजे पांढरी शुभ्र फुले असलेली ‘व्हायटी’ या प्रकारची वनस्पती! वनस्पतींचा अभ्यास करणाऱ्या पर्यटक, विद्यार्थी व संशोधकांसाठी हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरावा. मधमाशीपालन व्यवसाय करणाऱ्या मधपाळासाठी तर ही एक पर्वणीच आहे. व्हायटी वनस्पती पश्चिम घाट सहयाद्री क्षेत्रात फुलणारी झुडुप वर्गातील वनस्पती आहे. उंची ५ फूट असून आठ वर्षातून एकदा फुले येतात. फुले पांढऱ्या रंगाची असतात. या फुलांवर सर्व प्रकारच्या मधमाशा (फुलोरी, सातेरी, आग्या, मेलिफेरा, ट्रायगोना) मध आणि पराग गोळा करण्यासाठी काम करतात.
एखादी वनस्पती फुलोऱ्यात आली व फुलोरा संपल्यावर वनस्पतीच्या बिया जमिनीवर पडतात आणि दुसऱ्या वर्षी उगवतात. नवीन वनस्पती ८ वर्षांनी फुलोऱ्यात येते व त्यानंतर मधमाशा फुलातून मुबलक प्रमाणात असणारा मकरंद ( आणि पराग हे दोन्हीही गोळा करतात. मकरंदाचा मध तयार होतो आणि गोळा केलेला पराग मधमाशांच्या पिलाव्याला खाद्य म्हणून वापरतात.
वनस्पतीचा फुलोरा कालावधी नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात
या वनस्पतीचा फुलोरा कालावधी नोव्हेंबर – डिसेंबर आहे. तथापि, सहयाद्री घाट माथा परिसरात ठिकठिकाणी फुलोरा जानेवारीपर्यंत टिकणार आहे. अंधारी, फळणी, उंबरी, घाटाई मंदिर, मुनावळे कास (कास परिसर), रेणोशी, खरोशी, रूळे, शिरनार, दाभेमोहन, कोट्रोशी (कोयना खोरे परिसर), गावढोशी, वाळणे, आवळण, आरव, निवळी,आकल्पे, दरे तांब, पिंपरी, लामज, उचाट, वाघावळे, वलवण, पर्वत, सालोशी (कांदाटी परिसर) या गावांच्या परिसरात सध्या व्हायटी फुलली आहे.
नेमका कसा असतो रंग?
व्हायटी मधाचा रंग पांढरा पिवळसर असतो. व्हायटी मधातील असणाऱ्या ग्लुकोजमुळे थंडीत मधाचे कणीभवन (मध रवाळ होणे) लवकर म्हणजे २० ते ३० दिवसांत होते. पांढरा पिवळसर रवाळ मध, टोस्ट, ब्रेडबरोबर तसेच सरबत करून अथवा चपातीबरोबर आवडीने सेवन केला जातो. मधाची चव गोड, मधुर असते. हा मध बहुगुणी औषधी असून या मधास मोठी मागणी असते.