कराड प्रतिनिधी | रात्रीच्या शांत वातावरणात दरोडा टाकण्यासाठी दरोडेखोर एकत्रित आले. ठरल्याप्रमाणे दरोडा टाकणार इतक्यात पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले अन् दरोड्याचा डाव फसला. कराड पोलिसांनी पाच जणांच्या टोळीतील चार संशयितांना जेरबंद केले. मात्र, टोळीतील एका संशयिताने पोबारा केला. या टोळीकडून देशी बनावटीचे दोन पिस्टल, एक गावठी कट्टा, पाच राऊंड असा सुमारे 1 लाख 71 हजार 510 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
परशुराम उर्फ परशा रमेश करवले (वय 23), निशीकांत निवास शिंदे (वय 21), तुषार उर्फ बारक्या सुभाष थोरवडे (वय 23), आकाश उदय गाडे (वय 19) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार, दि. 3 रोजी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमनजीक उत्तरालक्ष्मी देवी मंदिरासमोरील मार्गालगत असलेल्या झाडाझुडपाच्या आडोशास अंधारामध्ये काही संशयित असल्याची माहिती कराड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूूर व पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी केलेल्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्यासह त्यांच्या सहकारी कर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन संशयितांवर झडप घातली. यावेळी एक संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला.
ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे कसून चौकशी करत झडती घेतली असता दोन देशी बनावटीचे पिस्तूल , 5 जिवंत राऊंड, एक गावठी कट्टा व गावठी कट्टयामध्ये वापरणेत येणारा राऊंड, एक लोखंडी टॉमी, मिरची पूड, दोन राखाडी व एक चॉकलेटी रंगाची माकड टोपी, एक काळे रंगाचा कापडी मास्क तसेच दोन निळे रंगाचे हॅन्ड ग्लोज मिळून आले आहेत. त्यानंतर याप्रकरणी संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
सर्व संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार
हे सर्व संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. परशुराम उर्फ परशा रमेश करवले याच्याकडे यापुर्वी देखील पिस्टल सापडली आहेत. मध्य प्रदेशातून पिस्टल आणून महाराष्ट्रात विक्री करणारी टोळी आहे. त्यांच्याकडून पिस्टल खरेदी करून ती सातारा भागात विक्री करण्याचा धंदा आता फोफावत चालला आहे. यावर जळगावपासून सातारा, कराड पोलिसांची नजर आहे. कराड पोलिसांनी या संशयितांचा चांगला पाहुणचार केला आहे. उद्या त्यांना कराड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.