सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील बोरणे घाट येथे सेल्फी काढत असताना एक देशमुख आडनाव असलेल्या युवतीचा तोल जाऊन ती गाडीसह दरीत जाऊन पडल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेनंतर छत्रपती शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स रेस्क्यु टीमच्या वतीने घटनास्थळी दाखल होत तत्काळ बचाव कार्य करत मुलीला दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील बोरने घाट ठोसेघर येथे पावसाळा असल्याने एक युवती सेल्फी काढण्यासाठी गेली होती. सेल्फी काढत असताना तिचा तोल गेला आणि ती दरीत कोसळली. या घटनेनंतर त्या ठिकाणी असलेल्या इतर नागरिकांनी याची माहिती छत्रपती शिवेंद्रराजे रेसक्यू टीमला दिली.
https://www.facebook.com/share/v/NjuJzEcHE9Hw2nat/?mibextid=jmPrMh
घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीमचे सदस्य चंद्रसेन पवार, आझाद खान, गणेश निपाणे, आदित्य पवार, प्रेरणा धाराशिवकर, पायल पवार हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदस्यांनी घटनास्थळी पाहणी करीत युवतीला बाहेर काढण्यास सुरुवात केली.
दरम्यान, मुसळधार पाऊस कोसळत असल्याने युवतीला बाहेर काढण्यात अडथळा निर्माण होत होता. तरी देखील रेसक्यु टीमच्या सदस्यांनी अथक परिश्रम करीत युवतीला खोल दरीतून बाहेर काढले. युवतीला बाहेर काढल्यानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.