सातारा प्रतिनिधी | पोलिस असल्याचे सांगून वृद्धांना लुटत संपूर्ण जिल्ह्यात थैमान घालणाऱ्या तोतया पोलिसांचा अखेर पोलिसांनी छडा लावला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने दोघांना ताब्यात घेतले. मात्र, यावेळी चोरट्याशी झालेल्या झटापटीत चोरट्याने वाहतूक पोलिसाचा चावा घेतला. तरीही पोलिसांनी चोर ट्यांना पकडले.
सिराज जाफर इराणी, मुस्लिम नासिर इराणी (दोघेही रा. लोणी काळभोर, जि. पुणे) असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. पुण्यातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असलेल्या या सराईत गुन्हेगारांच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस असल्याचे सांगून, तसेच दुकानांत खरेदी करण्याच्या बहाण्याने वृद्धांना लुटण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली होती. अशा चोरट्यांनी पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान होते. दरम्यान, चोरटेही डोक्याला हेल्मेट, तोंडाला रुमाल बांधून आल्याने ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये ओळखता येत नव्हते. त्यामुळे या तोतया पोलिसांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलिस अजय भोसले, गजानन वाघमारे शहरात बंदोबस्तावर असताना त्यांना एका दुचाकीवरून (एमएच १२ एसजी ५१६३) दोघे जण संशयितरीत्या फिरताना आढळून आले.
पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली असता ते शहरात संशयितरीत्या फिरताना दिसून आले. येथील स्टेट बँकेसमोर काही वेळ थांबल्यानंतर ते पुन्हा पुसेगाव रस्त्यावर बँक ऑफ इंडिया याठिकाणी गेले. तेथून पुढे जाऊन ते दिवाणी न्यायालयापासून दुचाकी माघारी आणून बँक ऑफ इंडियाच्या समोर उभी करून ते दोघे जण थांबले होते. त्यावेळी वाहतूक पोलिस श्री. भोसले व वाघमारे यांनी दोघांना शिताफीने पकडले. त्यावेळी त्यांच्यात झटापट झाली.
मात्र, पोलिसांनी त्यांना पकडून ठेवल्याने, तसेच त्याठिकाणी नागरिक जमा झाल्याने चोरट्यांना पळ काढता आला नाही. त्या झटापटीतबनासिर इराणी याने स्वतःच्या खिशातील एक लॅमिनेशन केलेले ओळखपत्र तोंडात टाकून खाण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलिसांनी त्याच्या तोंडात हात घालून ते ओळखपत्र काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने बोटांना चावा घेतला.
इजेची तमा न बाळगता वाहतूक पोलिसांनी त्याच्या तोंडात हात घालून ते ओळखपत्र काढले. दरम्यानच्या काळात त्याठिकाणी सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने, पोलिस उपनिरीक्षक कांबळे, पोलिस हवालदार शिवाजीराव खाडे, कुंडलिक कठरे, सागर बदडे, मकसूद शिकलगार घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयितांना पोलिस ठाण्यात आणले.