सातारा प्रतिनिधी | फलटण तालुका व परिसरामध्ये मागील तीन- चार दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. यंदा दिवाळीला जाणवणारी थंडी जाणवलीच नाही. मात्र, सध्या फलटण तालुका व परिसरात थंडी आणि त्याचबरोबर धुक्याची चादर हळूहळू दिसू लागली आहे. थंडी पडताच गहू पिकाच्या पेरणीने वेग धरला आहे.
पाऱ्यात घसरण होऊन थंडीत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. यंदा परतीच्या पावसाने आणि अवकाळीने खूप उशिरापर्यंत हजेरी लावत अगदी हिवाळ्याच्या कालावधीतही पावसाने खूप मोठी हजेरी लावली. नोव्हेंबरच्या सुरुवातीस तापमानात किमान तीन अंशाची घसरण होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आला होता. यादरम्यान दोन-तीन वेळा तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात बदल झाला. त्यामुळे गेली चार दिवसांपासून थंडीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांत हेच तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने थंडी बराच काळ लांबली. मात्र, राजेगाव सारख्या ग्रामीण भागात गहू, हरभरा तसेच थंडीच्या मदतीने येणाऱ्या पिकांना फटका बसला. यावर्षी म्हणावी तशी पेरणी या भागात झालेली नाही. काही शेतकऱ्यांनी ज्वारी पिकांच्या पेरण्या पूर्ण केल्या असून, पेरणी झालेल्या ज्वारी उगवणीच्या व वाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र, गहू, हरभरा पिकांना पोषक वातावरण नसल्याने या पेरण्या सुरू झालेल्या नाहीत.
येत्या दीड-दोन महिन्यांत पेरण्या पूर्ण होण्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी ज्वारी पेरणी संपत आली असून, हरभरा पेरणी सुरू आहे. थंडी पडताच गहू पिकाची पेरणी वेग धरेल. गावोगावी शेकोट्या पेटणार असून, थंडीच्या आगमनाची चाहूल लागताच फलटण तालुका व परिसरात ऊसतोड मजुरांच्या शेकडो टोळ्या दाखल झाल्या आहेत. गुलाबी थंडी असली तरी उघड्यावर असणाऱ्या या संसारांना उबदार करण्यासाठी गावोगावी शेकोट्या पेटताना दिसणार आहेत. ग्रामीण भागात या शेकोट्या प्रत्येकाला आल्हाददायक वाटतात.