राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेचं पडले काळजीत…; आज काय घेणार निर्णय?

0
1

सातारा प्रतिनिधी | महायुती सरकारचा पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असेल हे आता जवळपास निश्चित झालं असून एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असेल त्याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनणार की एकनाथ शिंदे केंद्राच्या राजकारणात जाणार की शिंदे पक्षाच्या प्रमुखपदाची जबाबदारी घेत संघटना वाढीसाठी काम करणार अशा विविध चर्चा सुरू आहेत. या सर्व चर्चेत सध्या काळजी वाहू असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी आपल्या दरे गावी दाखल झाले. दरम्यान, सध्याच्या घडामोडीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच काळजीत पडले असून ते आज काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शिरसाट यांचं महत्वाचं विधान अन् शिंदेंची शांत भूमिका…

काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी दाखल झाले. एरवी गावी आल्यानंतर ते माध्यमांशी हसत मुखत दिलखुलासपणे संवाद साधताते. मात्र, काल त्यांच्या चेहऱ्यावर चिंता असल्याचे दिसून आले. अशात ‘नाराज’ एकनाथ शिंदेंच्या शांत राहण्याचे संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना महत्वाचे विधान देखील केले. अद्याप मुख्यमंत्रिपदाचं नाव जाहीर झाले नाही. एकनाथ शिंदे महाराष्ट्र सोडून केंद्रात जाणार नाही. त्यांनी कॉमन मॅन म्हणून राज्यात जी प्रतिमा निर्माण केली ते सोडून ते दिल्लीत जाणार नाहीत. उपमुख्यमंत्रिपदाबाबत जो काही निर्णय असेल तो संध्याकाळपर्यंत ठरेल. आजच्या घडीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण हे स्पष्ट नाही. दिल्लीतल्या बैठकीतलं स्पष्टीकरण अद्याप पुढे आले नाही. शिवसेनेचा वाटा महायुतीच्या विजयात मोठा आहे. गृहखाते आमच्याकडे असले पाहिजे अशी मागणी असेल तर ते महत्त्वाचे आहे. राज्यात जातीय संघर्ष, दंगली हे हाताळण्यासाठी कसब लावावी लागेल. त्यामुळे हा कारभार आम्हाला चांगल्यारितीने सांभाळायचा आहे. एकनाथ शिंदे यांना राज्याच्या राजकारणात रस आहे. दिल्लीच्या राजकारणात गेले तर इथे लक्ष देता येणार नाही. त्यामुळे ते इथेच राहतील, असे शिरसाट यांनी म्हटले.

शिंदे आज माध्यमांशी बोलणार का?

एकनाथ शिंदे काल दोन दिवस दरे गावी मुक्कामी आले. त्यांनी अचानक आपल्या गावी जायचा निर्णय का घेतला? हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान, प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी देखील दरे गावात पोहोचले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी माध्यमांशी बोलने टाळले. आता आज तरी ते माध्यमांशी बोलणार का? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

यापूर्वीही पेचप्रसंगावेळी एकनाथ शिंदेंचा दरेगावी मुक्काम…

राज्यात गतनिवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळून देखील शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होते. पण, उद्धव ठाकरे स्वत:च मुख्यमंत्री झाल्याने नाराज झालेले एकनाथ शिंदे हे दरे मुक्कामी दाखल झाले होते.अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मध्येही मध्यंतरी धूसफूस सुरु झाल्यानंतर त्यांनी आपल्या गावाकडे येऊन मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता. ठाणे येथील हॉस्पिटलमधील घटना घडली त्यावेळीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे मुक्कामीच होते. त्याच ठिकाणाहून त्यांनी सर्व परिस्थिती हाताळली होती. त्यानंतर ते ठाण्याकडे रवाना झाले होते. सध्या देखील राज्यात मुख्यमंत्री कोण याबाबत चर्चा सुरु आहेत. गुरुवारीच मुख्यमंत्री दिल्लीत होते. रात्री उशिरापर्यंत अमित शहा यांच्याशी त्यांची चर्चा झाली. त्यानंतर ते मुंबईतून काल सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे या गावी दाखल झालेत.