कराड प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर २०२४ रोजी होत आहे. मतदान प्रक्रिया शांततेत, निर्भय व सौहार्दपूर्ण वातावरणात, कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण न होता पार पडण्यासाठी, मतदान केंद्रावरील होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर आठवडा बाजार जत्रा/यात्रा याचा परिणाम होऊ नये यासाठी मतदान केंद्रालगत भरणारे आठवडा बाजार व यात्रा/जत्रा २० नोव्हेंबर रोजी बंद ठेवणेबाबत आदेश कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांनी निर्गमित केलेले आहेत.
जिल्हाधिकारी सातारा यांचेकडील दि मार्केट अँड फेअर क्ट१८६२ चे कलम ७ (अ) अन्वये अधिकार प्रधान केलेचा आदेश क्र डिसी/एमएजी ३/ आबा/१४३४/९५ दि१०/११/१९९५ नुसार निवडणूक प्रक्रियेचे अनुषंगाने मतदान दिवशी आठवडा बाजार व यात्रा/जत्रा बंद अथवा पुढे ढकलणेबाबतचे आदेश करण्याचे अधिकार संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना त्यांचे क्षेत्रापुरते प्रदान करण्यात आलेले आहेत.
म्हणून तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, कराड फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रधान करण्यात आलेल्या अधिकारास अनुसरून मतदानाच्या दिवशी दि. २० रोजी कराड तालुक्यातील २५९ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मसूर, उंब्रज व विरवडे (ओगलेवाडी), तसेच २६० कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील चचेगाव, ओंड, कोळे, वडगाव (हवेली) या गावात भरणारे आठवडा बाजार व यात्रा / जत्रा बंद ठेवण्याबाबतचे आदेश निर्गमित केलेले आहेत.