महाबळेश्वरातील वेण्णा लेकचे मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते जल पूजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर मधील ‘वेण्णा लेक’ धरण गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला पाणीपुरवठा करण्याची चिंता मिटली आहे. लाखो पर्यटकांना वर्षभर बोटिंगचा मनमुरादपणे आनंद देणारे वेण्णा लेकच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. यावेळी महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी जलाशयाचे पूजन केले. पालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्याच्या इतर भागात पावसाचा जोर कमी असला तरी महाबळेश्वरमध्ये पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वेण्णा लेक ओव्हर फ्लो झाला आहे. पर्यटक देखील पावसात भिजत वेण्णा लेकमध्ये बोटिंगचा आनंद घेत आहेत.

एप्रिल अखेरच ‘वेण्णा लेक’मधील पाण्याने तळ गाठला होता. ऐन उन्हाळ्यात वेण्णा लेकमधील पाण्याने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासह पर्यटनावरही याचा विपरीत परिणाम झाला होता. मात्र, आता वेण्णा लेक पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.