कराड प्रतिनिधी | पाईपलाईन वाहून गेल्यानं गेली पाच दिवस बंद असलेला पाणी पुरवठा बुधवारी सायंकाळपासून सुरळीत होणार आहे. जुने पंपिंग स्टेशन कार्यान्वित केल्यामुळे तब्बल पाचव्या दिवशी कराडकरांना पाणी मिळणार आहे. दरम्यान, गेली दोन दिवस बॅनर लावून कराडच्या प्रभागांमध्ये पाण्याचे टँकर फिरत होते. त्यामुळे कराडकरांना पाण्याचं राजकारण देखील पाहायला मिळालं.
राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणांतर्गत सध्या नवीन कोयना पुलाजवळ विस्तारीत पुलाचं काम सुरू आहे. पुलाच्या पिलरसाठी नदीपात्रात एका बाजूला भराव घालण्यात आला होता. शनिवार, रविवारी मुसळधार पाउस झाला. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं. पाण्याचा प्रवाह वाढला. त्या प्रवाहामुळे कराड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन वाहून गेली होती. त्यामुळ गेली पाच दिवस पाणी पाणी करण्याची वेळ कराडकरांवर आली.
कराडकरांवरील पाणी संकटामुळं सर्वच राजकीय नेत्यांनी जुने पंपिंग स्टेशन कार्यान्वित करून पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. तसेच पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोयना नदीपात्रात चुकीच्या पध्दतीने भराव घातल्याबद्दल तक्रारीही केल्या. त्याची तातडीने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी कराडमध्ये येवून पाहणी केली.
माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आपत्कालिन परिस्थितीत कराडचा पाणी पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी नगरपालिका प्रशासनाला पाच पर्याय सुचवले. तसेच त्यावर कार्यवाही करण्याची सूचनाही केली आहे. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडीने सर्वात आधी जुने पंपिंग स्टेशन सुरू करण्याच्या मागणीचे पत्र मुख्याधिकाऱ्यांना दिले. तसेच आज बाळासाहेब पाटील यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या चुका जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी टँकरच्या माध्यमातून दोन दिवस प्रभागांमध्ये पाणी पुरवठा केला. काही टँकरवर राजकीय नेत्याच्या फोटोचे बॅनरही पाहायला मिळाले. त्यामुळे टँकरच्या पाण्याचे राजकारण जोरात होते.